पुणे । महापालिकेच्या थकीत मिळकतकर वसूलीसाठी महापालिकेच्या मिळकतकर विभागाने कंबर कसली आहे. 2017-18 च्या अंदाजपत्रकात या विभागास देण्यात आलेले उत्पन्नाचे उद्दीष्ठ पूर्ण करण्यासाठी पुढील चार महिन्यात 1 हजार कोटींच्या वसूलीचे उद्दीष्ठ ठेवण्यात आले असून त्यानुसार, वसूल होणार्या थकबाकीसाठी पेठ निरिक्षकांना थकबाकी निहाय उद्दीष्ट देण्यात आले आहे. तसेच लवकरच थकबाकी वसूलीसाठीचा बॅन्ड वाजा वादनाचा उपक्रमही सुरू करण्यात येणार असून त्यासाठी आवश्यक असलेल्या कायदेशीर बाबी तपासण्यात येत असल्याची माहिती मिळकतकर विभागाचे प्रमुख विलास कानडे यांनी दिली.
आत्तापर्यंत फक्त 802 कोटींची वसुली
महापालिकेच्या अंदाजपत्रकात 2017-18 साठी या विभागास सुमारे 1,816 कोटी रुपयांचे उद्दीष्ट देण्यात आले आहे. मात्र, 24 नोव्हेंबर अखेरपर्यंत या विभागास केवळ 802 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळालेले आहे. या विभागाकडे शहरातील सुमारे 8 लाख 40 हजार मिळकतींच्या नोंदी आहेत. तर, त्यांच्या कराची मागणीही सुमारे 1200 कोटींवर आहे. त्यामुळे अद्यापही मोठ्या प्रमाणात कर वसुली शिल्लक आहे. त्यामुळे या विभागाकडून पुढील चार महिन्यांत थकबाकी वसुलीसाठी विशेष उपाययोजना हाती घेण्यात येणार असल्याचे कानडे यांनी स्पष्ट केले.
वसूल होणार्या थकबाकीवर विशेष लक्ष
महापालिकेच्या मिळकतकर विभागाची थकबाकी सुमारे 1500 कोटींच्या वर आहे. मात्र, त्यातील अनेक थकबाकी दुबार नोंदणी, न्यायालयातील दावे यामुळे वर्षानुवर्षे वसूल झालेली नाही. तसेच ती वसूल करण्यासाठी मोठा वेळ आणि मनुष्यबळही लागणार आहे. त्यामुळे प्रशासनाने वसूल होणार्या थकबाकीवरच लक्ष केंद्रीत केले आहे. त्यात प्रामुख्याने 31 मार्च 2017 अखेरपर्यंत थकबाकी असलेले करदाते, 1 एप्रिल 2014 पासून नव्याने कर आकारणी करण्यात आली आहे. मात्र, त्यांनी अद्यापही कर भरलेला नाही, ज्या मिळकत धारकांची 2008 नंतर कर आकारणी झालेली आहे. मात्र, त्यांनी अद्याप कर भरलेला नाही अशा थकबाकी वसुलीवर भर देण्याच्या सूचना देण्यात आलेल्या असल्याचे कानडे यांनी सांगितले.