पुणे । यंदा अपेक्षित तेवढा मिळकत कर वसुल न झाल्याने मार्च अखेरजवळ आल्याने पालिका प्रशासनाची धावपळ सुरू झाली आहे. सन 2017-18साठी तब्बल 1 हजार 400 कोटींचा मिळकत कर वसूल करण्याचे उद्दिष्ट असताना आतापर्यंत केवळ 891 कोटी 86 लाखांचा मिळकतकर वसूल झाला आहे. मिळकतकर वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने विशेष कर वसुली पथकांची नियुक्ती केली आहे.
थकीत कर वसूल करण्यासाठी मोठ्या प्रमाणात जप्तीची कारवाई सुरू केली असून, गेल्या दहा दिवसांत 15 कोटी 84 लाख रुपयांचा मिळकतकर विभागाने थकबाकी वसुलीची मोहीम अधिक तीव्र केली आहे. यासाठी शहरात मोठ्या प्रमाणात जप्तीची कारवाई सुरू केली आहे. 1 जानेवारीपासून ही मोहीम अधिक तीव्र केल्याने दहा दिवसांतच तब्बल 15 कोटी 84 लाख रुपयांची थकबाकी वसूल झाली आहे. येत्या काही दिवस ही कारवाई अधिक कडक करण्याचे संकेत पालिका प्रशासनाने दिले आहेत. पालिकेचा थकीत मिळकतकर भरावा, यासाठी पालिका प्रशासनाने अनेक योजना राबविल्या; मात्र त्यानंतरही अनेक मिळकतदारांकडे कोट्यवधी रुपयांची थकबाकी आहे. वारंवार योजना राबवूनदेखील याकडे दुर्लक्ष करून थकबाकी न भरणार्या मिळकतींना नोटीस पाठविण्यास प्रशासनाने सुरुवात केली आहे. अंदाजपत्रकात ठरवून दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात थकबाकी असलेल्या मिळकतींचा शोध घेऊन त्यावर कारवाई करण्याचा निर्णय कर आकारणी व कर संकलन विभागाने घेतला आहे.