मिळकतींची देखभाल करण्याबाबत महापौरांनी दिल्या अधिकार्‍यांना सूचना

0
पिंपरी, – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अ क्षेत्रीय कार्यालया अंतर्गत असलेल्या मिळकतींमधील गणेश तलाव, उद्याने, व्यायमशाळा, बॅडमिंटन हॉल, क्रीडांगणे, जलतरण तलाव आदींची पाहणी महापौर राहुल जाधव यांनी केली. यावेळी महापौर यांच्या सोबत माजी उपमहापौर शैलजा मोरे, अ प्रभागाच्या अध्यक्षा अनुराधा गोरखे, नगरसदस्य केशव घोळवे, वैशाली काळभोर, मिनल यादव, शर्मिला बाबर, अमित गावडे, प्रभाग अधिकारी आशादेवी दुरगुडे, क्रीडा अधिकारी रज्जाक पानसरे, प्रशासन अधिकारी प्रभावती गाडेकर, उद्यान अधिक्षक डी. एन. गायकवाड आदी उपस्थित होते.
अ क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत असलेल्या मदनलाला धिंग्रा मैदान, गणेश तलाव, हेडगेवार भवन, बॅडमिंटन हॉल, संत तुकाराम उद्यान, संजय काळे क्रीडांगण, कलादालन, शंकर शेट्टी उद्यान, जलतरण तलाव-मोहननगर, श्री शाहू उद्यान, बहिरवाडे मैदान, श्रीधरनगर उद्यान, गोलांडे उद्यान आदी इमारती आणि उद्यानांच्या वॉल कंपाऊंडची दुरूस्ती करुन उंची वाढविणे, उद्यानात मुलांसाठी खेळणी व्यवस्थित बसविणे, दररोज साफसफाई करणे, राडारोडा उचलणे, उद्यानातील कारंजे व्यवस्थित चालू ठेवणे, मिळकतींची नादुरूस्ती झाल्याने मिळकतींसाठी सुरक्षा व्यवस्था ठेवणे, व्यायामशाळांसाठी अद्ययावत व्यायाम साहित्य पुरविणे, क्रीडांगणे विकसित करणे, तसेच गणेश तलावातील गाळ तातडीने काढणेबाबतच्या सुचना महापौर राहुल जाधव यांनी संबंधित अधिकार्‍यांना दिल्या.
सकाळी उद्यानात आलेल्या ज्येष्ठ नागरिकांशी चर्चा करुन उद्यानातील सुविधांबाबत असलेली कमतरता विचारात घेऊन संबंधित अधिका-यांना सुविधा पुरविणेबाबत सुचना दिल्या, असे महापौर जाधव यांनी सांगितले.