गोल्ड कोस्ट : 2018 च्या राष्ट्रकुल स्पर्धेतले पहिले सुवर्णपदक भारताला मिळाले आहे. वेटलिफ्टिंगमध्ये सैखोम मिराबाई चानू हिने महिलांच्या 48 किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावलेे. चानूने तिचा आधीचा विक्रम मोडत 196 किलो वजन उचलण्याचा नवा विक्रम प्रस्थापित केला. हे चानूचे राष्ट्रकुलमधील दुसरे पदक आहे. चार वर्षांपूर्वी ग्लास्गो इथे झालेल्या स्पर्धेत तिने रौप्य पदक मिळवले होते. गेल्यावर्षी वर्ल्ड वेटलिफ्टिंग चॅम्पियनशीपमध्ये चानूने पहिल्या प्रयत्नात 85 किलो वजन उचलले. त्यानंतर क्लीन अँड जर्कमध्ये 109 किलो वजन उचलून सुवर्णपदकावर नाव कोरले होते.
पहिल्या दिवशी धडाकेबाज सुरुवात
ऑस्ट्रेलियाच्या गोल्डकोस्ट येथे रंगलेल्या राष्ट्रकुल खेळ स्पर्धेत पहिल्या दिवशी भारताने धडाकेबाज सुरुवात केली. भारताच्या गुरुराजा आणि मीराबाई चानू यांनी वेटलिफ्टींग प्रकारात अनुक्रमे रौप्य आणि सुवर्णपदकाची कमाई केली. गुरुराजाने पुनरागमन करत भारताला पहिले विजेतेपद मिळवून दिले. तर मीराबाईने सहाही संधींचे सोने करत भारताला सुवर्णपदक मिळवून दिले. सामना संपल्यानंतर मीराबाईने पत्रकारांशी संवाद साधला, यावेळी कोणत्याही वैद्यकीय मदतीशिवाय मीराबाईने देशासाठी ही सुवर्णकामगिरी केल्याचे समोर आले. स्पर्धेदरम्यान माझे वैद्यकीय सहकारी माझ्यासोबत हजर नव्हते. स्पर्धेच्या ठिकाणी त्यांना प्रवेश नाकारण्यात आल्यामुळे मला योग्य त्या प्रकारे वैद्यकीय मदत मिळू शकली नाही. मी आयोजकांना माझ्या सहकार्यांना आत सोडण्याची विनंती केली, मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही. त्यामुळे आमच्या संघातील सर्वजण एकमेकांना मदत करत होते, असे मीराबाईने सांगितले. पत्रकारांशी बोलत होती.