पणजी-मी प्रामाणिकपणे, सचोटी आणि निष्ठेने शेवटच्या श्वासापर्यंत गोव्याच्या जनतेची सेवा करेन असे म्हणत, माझ्यामध्ये भरपूर जोश भरलेला असून मी पूर्णपणे होशमध्ये आहे अशा शब्दात गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी काँग्रेसला प्रत्युत्तर दिले. आज बुधवारी गोवा विधानसभेत त्यांनी अर्थसंकल्प सादर केला. यावेळी ते बोलत होते.
मनोहर पर्रिकर यांच्यावर टीका करताना गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष गिरीश चोडनकर यांनी जोशबद्दल बोलण्यासाठी पर्रिकर होशमध्ये असले पाहिजेत असे धक्कादायक वक्तव्य केले होते. त्याला पर्रिकरांनी आज उत्तर दिले.
मनोहर पर्रिकर यांच्या नाकामध्ये नळी आहे. त्या अवस्थेत त्यांनी अर्थसंकल्प मांडले. पर्रिकरांनी रविवारी मांडवी नदीवर बांधण्यात आलेल्या पाच किलोमीटर लांबीच्या ब्रिजचे उद्घाटन केले. त्यावेळी तिथे बोलताना त्यांनी उरी चित्रपटातील ‘हाऊज द जोश’ या वाक्याने भाषणाची सुरुवात केली होती. त्यावेळी उपस्थित जनसमूहाने ‘हाय सर’ असा त्यांना प्रतिसाद दिला होता.