‘मी सुरेश वालीशेट्टी’ आत्मकथनातून उलगडणार रहस्ये!

0

अंडर वर्ल्डमधील डॉन दाऊद, छोटा राजन, अरुण गवळी, अमर नाईक यांच्या टोळ्यांशी दिलेली टक्कर, जीवाला धोका पत्करून केलेली शूटआऊट्स तसेच जे.जे. हॉस्पिटल हत्याकांड, देशाला हादरवणार्‍या मुंबईतील बाँबस्फोटाचा तपास आदी खटल्यांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करून तीन शौर्यपदकांसह चार राष्ट्रपतीपदकांचे महाराष्ट्रातील एकमेव मानकरी सुरेश वालीशेट्टी यांच्या निर्भीड आत्मकथन पुस्तकाचे प्रकाशन माजी पोलीस महासंचालक अरविंद इनामदार यांच्या हस्ते नुकतेच झाले. पोलीस दलातील या निर्भीड जवानाने आपल्या जीवनात सामान्य कुटुंबातील मुलगा ते एक कर्तबगार सैनिक असा प्रवास करत सन्मान मिळवला आहे. आत्मकथन हे निमित्तमात्र आहे. मात्र, या जीवनाच्या प्रसंगांतून मनातील जिद्द आणि देशाप्रति सेवेचा वसा स्पष्ट दिसून येतो. ‘मी सुरेश वालीशेट्टी’ या शीर्षकाखाली प्रकाशित करण्यात आलेल्या आत्मकथनात सुरेश वालशेट्टी यांनी, मागे वळून पाहताना, निपाणी, पोलीस दलात समावेशापूर्वी, लग्नाची बेडी, नाशिक, दिल्ली व नागपूरचे प्रशिक्षण, प्रक्षेपण कालावधी, मुंबई शहर पोलीस मुख्यालय, पहिलीच ड्युटी, पोलीस संपावर जातात, पदकांविषयी थोडंस, उल्लेखनीय सेवापदक, दिल्लीची पहिली तपासमोहीम, 12 मार्च 1993!,

आठमुठे अधिकारी, 2003 चा बाँबस्फोट, सिनेकलावंतांना समज, जे. जे. हत्याकांड, गेमचा गेम, संजय दत्तचा खटला, वीज मंडळाचा शॉक, प्रतीक्षानगरमधील प्रतीक्षा, पहिलं प्रमोशन, सत्याचा विजय, चोरी मुख्यमंत्र्यांच्या घरी, लालफितीचा फटका, डॉ. दत्ता सामंत खून, कॅसेट किंगचा खून, असेही सत्कार, पोलिसांचा बिनशर्त माफीनामा, गुटखा उद्योजकांची कहाणी, उल्लेखनीय सेवा पदक आणि मी, अशा विविध प्रसंगांचा आढावा मांडला आहे. यात त्यांनी आपल्यावर असलेली जबाबदारी आपण यशस्वीरीत्या पार पाडलीच पाहिजे, अशी भावना व्यक्त केली आहे. जन्मगाव निपाणी ते पोलीस दलातील सेवा याचा इतिवृत्त या आत्मकथनात असला, तरी त्यांच्या लहानपणीच वडिलांचे झालेले अकाली निधन आणि त्यांच्यासह चार भावंडं, आई अशा विनाआधार कुटुंबाला मामाने दिलेली साथ याचा त्यांनी आवर्जून उल्लेख करत त्यांनी मामाप्रति आदर विशद केला आहे. अनेक प्रसंग आणि भावना मांडतानाच, वयाच्या 35 व्या वर्षी हक्काच्या सदनिकेसाठी अर्ज केला होता निवृत्तीनंतर आज 70 वर्षे वय झाले आहे. मात्र, अजूनही घराच्या प्रतीक्षेत आहे, अशा शब्दात खंत व्यक्त केली आहे. मानवी जीवनात कर्तृत्वाला सन्मान आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या कर्तृत्वाने मोठे व्हावे व त्यातून समाजाची सेवा करत राहणे गरजेचे आहे, असा संदेश या पुस्तकातून दिला आहे. या पुस्तकाला आयपीएस मीरा बोरवणकर यांची प्रस्तावना असून, त्यांनी सुरेश वालीशेट्टी यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरल्याचा उल्लेख करतानाच त्यांच्याप्रति आदर व्यक्त केला आहे.

– राजेंद्र पाटील
जनशक्ति प्रतिनिधी, पनवेल
9967285618