नाशिक : नाशिक शहरातील सर्व जमिनीवर करवाढ लादणार्या मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्णयामुळे सत्ताधारी आणि विरोधक असे सर्वच नगरसेवक तसेच नागरिक मोठ्या प्रमाणात नाराज झाले असून, या करवाढीच्या निर्णयाविरोधात आक्रमक होत येत्या 23 एप्रिलला होणार्या महासभेत आयुक्त मुंढे यांच्यावर अविश्वास आणण्याची तयारी केली जात आहे. याकरिता मनपा अधिनियमांचा आधार घेतला जात आहे. त्यामुळे ही महासभा वादळी ठरण्याची शक्यता आहे. आयुक्तांच्या या निर्णयाविरोधात आता थेट सत्ताधारी भाजपच मैदानात उतरला आहे. महापालिकेत सामाविष्ट असलेल्या 23 खेड्यांमध्ये आजही शेतीव्यवसाय केला जातो. विकास आराखडा जाहीर झाल्यानंतर या खेड्यांमधील मोठ्या प्रमाणात जमिनी पिवळ्या पट्ट्यात आल्या आहेत. या वडिलोपार्जित जमिनीत पिके घेतली जात आहेत. अशा जमिनींवर कर लावण्याचा निर्णय अन्यायकारक आहे, असे मत शेतकर्यांनी व्यक्त केले आहे.