मुंबई । मुंबईच्या जागी आता अहमदाबादला महत्त्व दिले जात आहे. केंद्र सरकार मुंबईचे महत्त्व कमी करत आहे. महाराष्ट्र सरकार मोदी घाबरून दबक्या आवाजात या पाठिंबा देत आहे, असा आरोप राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी विधानसभेत केला. सोमवारी अर्थसंकल्पावर विभागवार मागण्यांच्या चर्चेवेळी ते बोलत होते. मेक इन इंडिया, मेक इन महाराष्ट्र, मॅग्नेेटिक महाराष्ट्र यातून हातात काय आले हे अजून समजले नाही. मेक इन 8 लाख कोटी गुंतवणूक येणार होती किती प्रोजेक्ट आले याची यादी पटलावर ठेवावी, 12 लाख कोटी मॅग्नेटिक याचीही माहिती द्यावी. मुख्यमंत्री, उद्योगमंत्री यांच्याव्यतिरिक्त कुणालाही या प्रकल्पाविषयी माहिती नाही. फक्त आकडे फुगवून सांगितले जात आहे. रोजगाराचा प्रश्न सुटला नाही. या उद्योगासाठी सरकार जागा कुठून देणार आहे.
नाणार प्रकल्पामुळे असुरक्षित वातावरण
विजेचे दर आज राज्यात वाढले आहे. हे दर परवडणारे नाही. सरकारने यावर काहीतरी मार्ग काढण्याची गरज आहे. नाणार प्रकल्पाबाबत सरकारने सभागृहात माहिती दिली. मुख्यमंत्र्यांनी त्याबाबत निर्णय घ्यावा, असा मंत्री म्हणतात तरी अद्यापही मुख्यमंत्र्यांनी कोणताही निर्णय घेतला नाही. नाणार प्रकल्पावर चर्चा केली जात नाही सरकारने तसे आश्वासन दिले होते. कुठला प्रकल्प कुठे ठेवावा हे सरकारला कळत नाही का? एका अणुभट्टीच्या बाजूला हा नाणार प्रकल्प सरकार उभारत आहे. एक ठिणगी इकडच्या तिकडे झाली तर मोठे नुकसान होईल. कोकणचे लोक असाच विरोध करणार नाही. त्यांनी सर्व गोष्टींचा विचार केला आहे. सरकारने हा प्रकल्प ठेवणार की नाही हे स्पष्ट करावे.
कामगारांना देशोधडीला लावण्याचा प्रयत्न
मोदी प्रत्येक ठिकाणी इझी ऑफ डूइंग बिझिनेसचा उल्लेख करतात. इझी ऑफ डुइंग बिझनेसच्या माध्यमातून कामगारांना देशोधडीला लावण्याचा प्रयत्न केला जात असेल, तर सरकार हा विषय जरा बाजूला ठेवावा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे लंडन येथील घर विकत घेतले आहे. मागच्या वर्षी सरकारने या घराच्या देखभालीसाठी केलेला खर्च दाखवला. मात्र, या वर्षी एक रुपयाही दाखवला नाही, मागच्या वर्षी 8 कोटी 30 लाख खर्च केले गेला. मात्र, यावर्षी 20 कोटी खर्च केला जात आहे, पण तो का केला जात नाही ते सांगण्यात आले नाही. अंगणवाडी सेविकांना योग्य वेळी मानधन मिळायला हवे. जोपर्यंत अंगणवाडी सेविकांना मानधन मिळत नाही तोपर्यंत अंगणवाडी सचिवांचा पगार करू नका, अशी काहीतरी ऑर्डर काढा.