मुंबईकरांना मिठीची मगरमिठी पुन्हा नको म्हणून सेन्सर!

0

मुंबई । पावसाळ्यात मुंबईची तुंबापुरी होऊन धोका निर्माण होऊ शकतो. महाप्रलयावेळी मिठी नदीने अनेकांना आपल्या मगरमिठीत ओढले. या घटनांची पुनर्रावृत्ती टाळण्यासाठी आता सेन्सर बसवण्यात आले आहेत. मुंबईतील पाच नद्या आणि दोन तळ्यांमध्ये वाढत्या पाण्याच्या पातळीची माहिती देणारे ट्रान्समीटर्स बसवण्यात आले असून, त्यामुळे पूरस्थिती निर्माण झाल्यास तत्काळ धोक्याची माहिती कळू शकणार आहे.

संभाव्य दुर्घटना यामुळे टाळता येणार आहेत. पावसाळ्यापूर्वी ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार आहे. यासाठी बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या (बीएमसी) पाणी निचरा विभागाकडून 7 सेन्सर्स उपकरणे बसवण्यात येणार आहेत. सात पाण्याच्या ठिकाणांसाठी एक याप्रमाणे हे बसवण्यात येणार आहे. सौर ऊर्जेवर चालणारे हे उपकरण असून त्याची प्रत्येकी 70 लाख रुपये इतकी किंमत आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वी याचे निश्‍चित ठिकाणी इन्स्टॉलेशनचे होणार आहे. या ट्रान्समीटर्सला सेन्सर्स लावलेले असणार आहेत. सीमकार्ड आणि जीपीएस तंत्रज्ञानाच्या माध्यमातून हे उपकरण चालवले जाणार आहे. यामुळे पाण्याच्या पातळीत वाढ होण्यास सुरुवात झाल्यास तत्काळ संबंधित ठिकाणासह आवश्यक माहिती शहराच्या आपत्ती नियंत्रण कक्षाला एसएमएसद्वारे कळू शकणार आहे.

पुराच्या धोक्याचा इशारा कळणार
सध्या मिठी नदीमध्ये अशा प्रकारचे फ्लो लेवल ट्रान्समीटर बसवण्यात आले आहे. मात्र, मोठ्या पावसावेळी पालिकेच्या कर्मचार्‍यांना स्वतः त्या ठिकाणी जाऊन पाण्याच्या पातळीची पाहणी करावी लागते. मात्र, या नव्या यंत्रणेमुळे ही प्रक्रिया आणखी सोपी होणार आहे. यामुळे मिळालेले संदेश तत्काळ सर्व वॉर्ड कार्यालयांना पाठवण्यात येणार आहेत. त्यानंतर संबंधित वॉर्ड ऑफिसर यावर कारवाई सुरू करू शकतील. या नव्या यंत्रणेमुळे सखोल भागत राहणार्‍या नागरिकांना पूरस्थितीच्या धोक्याचा इशारा लवकरात लवकर कळवून त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवता येणे शक्य होणार आहे.