मुंबईकरांमध्ये वाढतोय ताणतणाव, आत्महत्येत झाली वाढ

0

मुंबई : मुंबई शहरातील सध्याची जीवनशैली अतिशय वेगवान झाली असून त्यातून निर्माण होणार्‍या ताणतवाणामुळे येथील लोक आत्महत्या करू लागले आहेत. अशा प्रकारे मुंबईत अचानक आत्महत्याचे प्रमाणे वाढल्याचे दिसून आले. गेल्या काही दिवसांमध्ये मुंबईत विविध ठिकाणी विविध वयोगटांतल्या व्यक्तींनी आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत. महाराष्ट्रात प्रशासकीय अधिकारी असलेले दांपत्य म्हैसकर यांच्या मुलाने इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केल्यानंतर मुंबईतील नागरिकांवरील ताणतणाव वाढत असल्याची चर्चा सुरू झाली. याच तणावाखाली जावून पवईतील हॉटेलमध्ये संजीव राजोरिया (34) या एमटीएनएलमधील अधिकार्‍याने बुधवारी गळफास घेत आत्महत्या केली. त्यानंतर गुरुवारी विक्रोळीत शेअर व्यवसायातील सल्लागार पवन पोतदार आणि टाटा मोटर्समध्ये वरिष्ठ व्यवस्थापक पदावर काम केलेल्या प्रशांत सिबल यांनी शुक्रवारी आपली जीवनवात्रा संपविले. अतिजलद गतीने जीवनशैली निर्माण झाल्याने या शहरातील नागरिकांमधील विचार करण्याची प्रक्रियाच खुंटली आहे. त्यामुळे छोट्याशा संकटातही डगमगून जात टोकाचे निर्णय घेणे लोक तातडीने पसंत करत असल्याचे मानसोपचार तज्ज्ञांचे निरीक्षण आहे.

इमारतीवरून उड्या मारून करतात आत्महत्या
आत्महत्याग्रस्तांचे कारणी जरी वेगवेगळी असली, तरी त्यामागील ताणतणाव हे एकमेव सूत्र असल्याचे आढळून आले आहे. अंधेरी येथील मनप्रीत सहान हा ब्लू व्हेल गेम या ऑनलाइन जीवघेण्या खेळ्याच्या आहारी गेला आणि त्यानेही आत्महत्या केली, तो इयत्ता नववीमध्ये शिकत होता. इमारतीच्या गच्चीवरून त्याने उडी मारली. भांडूपमध्ये कर्जाच्या बोज्यामुळे रवींद्र कदम (50) यांनी गळफास घेतला, तर साकिनाक्यात गुरुवारी एका 22 वर्षीय तरुणीने इमारतीवरून उडी घेत आपले आयुष्य संपविले होते. राजोरीया एमटीएनएलमध्ये सहाय्यक व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यरत होते. तेथेच काम करणार्‍या चार वरिष्ठ अधिकार्‍यांनी त्यांचा मानसिक छळ केल्याचा आरोप पत्नी नीलम यांनी केला आहे. पोलिसांनी त्यापैकी काहींची चौकशी केल्याची माहिती मिळते. राजोरीया आत्महत्या प्रकरणात कुटुंबीयांकडून केलेल्या आरोपांची शहानिशा पवई पोलिसांकडून सुरू आहे.

आजरालाही कंटाळून जीवन संपवतात
शेअर व्यवसायात सल्लागार असलेल्या पोतदार यांनी सकाळी विक्रोळीतल्या कैलाश पार्कमधील कार्यालयात गळफास घेतला. कार्यालयातील कामगाराने पोतदार यांना राजावाडी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारांआधीच त्यांचा मृत्यू झाला होता. घाटकोपरच्या पंतनगर परिसरात राहणारे पोतदार आजारी होते. त्यांना हृदयविकार, मधुमेह अशा व्याधी होत्या. त्यामुळे ते मानसिक तणावाखाली होते, अशी माहिती कुटुंबीयांनी दिल्याचे पोलीस उपायुक्त सचिन पाटील यांनी सांगितले.

संकटाने खचून जाऊन करतायेत आत्महत्या
सिबल यांनी एप्रिल महिन्यात टाटा मोटर्स कंपनीमधून स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. सिबल यांच्या आईचा काही महिन्यांपूर्वी अपघाती मृत्यू झाला होता. त्या घटनेचा प्रभाव सिबल यांच्यावर होता. मानसिक तणावात असलेले सिबल स्वतःला घरात कोंडून घेत, अशी माहिती कुटुंबीयांनी पोलिसांना दिली आहे. सिबल यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी पोलिसांनी पुढील तपासासाठी हस्तगत केली. सुमारे दीड पान इंग्रजीतला मजकूर असून त्यात दोन मुलांचे शिक्षण, भविष्यातील उदरनिर्वाह याबाबत सिबल यांनी लिहिले आहे. मला माफ करा, मी चांगला कुटुंबप्रमुख बनू शकलो नाही, असाही उल्लेख आहे, अशी माहिती काळाचौकी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक दिलीप उगळे यांनी दिली.