मुंबई । एका बाजूला रेल्वे प्रशासनाने मुंबईतील उपनगरीय लोकल सेवेत वातानुकूलित गाड्या आणल्या आहेत तसेच बंबार्डीयरसारख्या प्रशस्त जागा असलेल्या लोकल चालू केल्या आहेत, तरीही जुन्या, भंगार झालेल्या गाड्या चालवण्याचा मोह मात्र अजून रेल्वेचा सुटत नाही. दादर रेल्वेस्थानकात शुक्रवारी अशाच एका जुन्या लोकलच्या डब्याला लागलेल्या आगीनंतर प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. आग लागलेली लोकल ही भारत इलेक्ट्रिकल लिमिटेड बनावटीची असून मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर याच्या आठ लोकल गाड्या अजूनही धावत असतात. या जुन्या लोकल गाड्या धावण्यास योग्य नसून प्रवाशांसाठी धोकादायक ठरू शकतील, असा अहवाल 2014 मध्येच मध्य रेल्वेचे तत्कालीन मुख्य सुरक्षा आयुक्त चेतन बक्षी यांनी सादर केला होता. पण, त्याकडे रेल्वे प्रशासनाने पूर्ण दुर्लक्ष केल्याचे आता स्पष्ट झाले आहे.
सीएसएमटीहून निघालेली ‘भेल’ बनावटीची जुनी लोकल शुक्रवारी रात्री सव्वा नऊच्या सुमारास दादर स्थानकात फलाट क्रमांक एकवर आली. त्याचवेळी मोटरमनपासून पाचवा डबा असलेल्या मोटरकोचमध्ये तांत्रिक बिघाड होऊन धूर येऊ लागला. त्यामुळे प्रवाशांमध्ये घबराट पसरली. प्रवाशांनी साखळी खेचून लोकल थांबविली. अग्निशमन दलाच्या मदतीने ही आग विझविण्यात आली. 2012 ते 2014 या दोन वर्षांत जुन्या लोकल गाड्यांना आग लागल्याच्या नऊ घटना झाल्या. त्यापैकी सात लोकल गाड्या ‘भेल’ बनावटीच्या होत्या. या जुन्या लोकल गाड्या धावण्यास योग्य आहेत की नाही याचा आढावा घेण्यात आला.
‘मरे’च्या 12 जुन्या लोकल
मध्य रेल्वेच्या ताफ्यात 142 लोकल गाड्या आहेत. त्यामध्ये सध्या ‘भेल’ बनावटीच्या जुन्या आठ लोकल असून त्या मुख्य मार्गावर धावतात. एका लोकलचे आयुर्मान साधारणपणे 25 वर्षे असते. ‘भेल’च्या ताफ्यात असलेल्या लोकल गाड्यांंना 18 ते 20 वर्षे झाली आहेत तसेच मध्य रेल्वे ताफ्यात 12 लोकल गाड्या रेट्रोफिटेड म्हणजेच डीसी (डायरेक्ट करंट) ते एसी (अल्टरनेट करंट) परावर्तन केलेल्या आहेत. या गाड्यादेखील जुन्या आहेत. दादर स्थानकातील लोकल गाडीच्या आगीच्या घटनेची चौकशी करण्यासाठी समिती नेमण्यात आली असून पंधरा दिवसांत अहवाल सादर केला जाणार आहे.