मुंबईच्या पथकाकडून भुसावळातील गोदामाची तपासणी

0

भुसावळातील स्वस्त धान्य वाटपातील भ्रष्टाचार प्रकरणाची अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापटांकडून दखल

भुसावळ– भुसावळातील शासकीय गोदामात क्विंटलमागे दहा ते बारा क्विंटल धान्य कमी वाटप होत असल्याचे तक्रार जिल्हा परीषद सदस्य पल्लवी प्रमोद सावकारे यांनी केल्यानंतर माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी शासकीय गोदामाला भेट देत गोदामातील गैरव्यवहार चव्हाट्यावर आणला होता तर जळगाव जिल्ह्यात स्वस्त धान्य वितरणात तब्बल शंभर कोटींचा गैरव्यवहार झाल्याचा दावा केला होता. अन्न व पुरवठा नागरी मंत्री गिरीश बापट यांच्यासह राज्याचे मुख्य सचिव व सचिवांकडे कैफियत मांडली होती. मंत्री बापट यांनी खडसे यांच्या तक्रारीचे गांभीर्याने दखल घेत शनिवारी भुसावळातील गोदामातील गैरव्यवहार खोदून काढण्यासाठी दोन अधिकार्‍यांचे पथक पाठवले आहे. या पथकाने सकाळपासून गोदामाचा ताबा घेत, सर्व कागदपत्रे व रजिस्टर तपासण्यास सुरुवात केली. नेमकी काय तपासणी केली व काय आपणास आढळले ? असे पथकाला विचारले असता अधिकार्‍यांनी लागलीच काही माहिती देता येणार नसल्याचे प्रसिद्धी माध्यमांना सांगितले.

प्रमाणिकरण कामामुळे शनिवारी धान्य वाटपास ‘बे्रक’
भुसावळातील गोदामाची तपासणी करण्यासाठी मुंबईतून आलेल्या पथकाला धान्याचे प्रमाणिकरण (प्रति गोणी 50 किलो) करावयाचे असल्याने शनिवारी शहर व तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदारांना धान्य वाटप करण्यात आले नाही. मुंबईतील अधिकार्‍यांनी गोदामाची पाहणी करून स्टॉक रजिस्टर ताब्यात घेतले तसेच आलेल्या व वाटप झालेल्या धान्याची नोंदी तपासल्या शिवाय धान्य प्रमाणिकरण करण्याची प्रक्रिया शनिवारी दिवसभर सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.

एफसीआयकडील धान्य प्रमाणिकरणाविनाच दाखल
एफसीआयकडून पाठवण्यात येणार्‍या धान्यावर मूळात 50 किलो वजनाचे लेबल असलेतरी हे धान्य प्रमाणित नसल्याचे सिद्ध झाले आहे. 978 गव्हाची पोती व दोन हजार 900 तांदळाची पोती अप्रमाणित असल्याने त्यांचे प्रमाणिकरण करण्याची प्रक्रिया शनिवारी दिवसभरात सुरू होती होती.

चार महिन्यांपूर्वीच्या चौकशीचे काय ?
चार महिन्यांपूर्वीदेखील भुसावळातील शासकीय गोदामाची तपासणी झाली होती मात्र त्यावेळच्या अधिकार्‍यांनी काहीही गैरप्रकार नसल्याची तोंडी माहिती प्रसिद्धी माध्यमांना दिली त्यामुळे हे अधिकारी मॅनेज झाले की काय? असा प्रश्‍न कालच्या कारवाईवरून उपस्थित होत आहे.

सहाय्यक संचालक दाखल
भुसावळातील शासकीय धान्य गोदामातील भ्रष्टाचाराची पाळेमुळे खोदून काढण्यासाठी मुंबईतील पुरवठा आयुक्त कार्यालयातील सहाय्यक संचालक पद्माकर गांगवे व त्यांचे सहाय्यक म्हणून लिपिक नीलेश जाधव शनिवारी सकाळीच दाखल झाले. उभय अधिकारी म्हणाले की, धान्य वाटपात भ्रष्टाचार झाला असल्यास त्याची पाळेमुळे खोदून काढू, जोपर्यंत आमची चौकशी होत नाही तोपर्यंत भुसावळ आम्ही सोडणार नाहीत, चौकशी करण्यात आलेला गोपनीय अहवाल आम्ही राज्य शासनाला सादर करू, असे गांगवे म्हणाले.