मुंबईतील उंच इमारतींमुळे पावसावर होतोय विपरित परिणाम

0

मुंबई । एकेकाळी दुमजली लाकडी चाळींनी नटलेली ही मुंबई बघता बघता सिमेंटचं जंगल बनलं. नव्वदच्या दशकापर्यंत या मुंबापुरीत केवळ कापड गिरण्यांच्या चिमण्याच तेवढ्या उंच होत्या… दक्षिण-मध्य मुंबईत कुठेही उभं राहून नजर फिरवली तर तेव्हा गिरण्यांच्या चिमण्या हमखास दिसायच्या… दुमजली लाकडी चाळी आणि त्यांचं ब्रिटीशकालिन बांधकाम हेेदेखील पाहणार्‍याला कायमच भुरळ पाडत असे. अख्खी मुंबई अशा वास्तूंनी नटलेली होती. मात्र 1982 साली गिरण्यांचा संप झाला आणि 90च्या अखेरीस देशात खासगीकरणाचे वारे घोंघावू लागले. इथूनच मुंबईची रया जाण्यास खरी सुरुवात झाली. दुमजली चाळी आणि गिरण्या जमिनदोस्त करून त्या जागेवर गगनचुंबी टॉवरर्स उभारण्यात आले. मुंबईकरांची मुंबई सिमेंटचं जंगल बनू लागली. आज याच सिमेंटच्या जंगलामुळे मुंबईचं हवामान बिघडण्याची वेळ आलेली आहे.

मुंबईतील वाढत्या गगनचुंबी इमारतींमुळे पावसाला अडथळे ठरत असल्याची माहिती एका अभ्यासातून समोर आली आहे. यासोबतच उंचचउंच इमारतींमुळे मान्सूनचा अचूक अंदाज बांधणेदेखील अवघड होत असल्याचे निरीक्षणदेखील या अभ्यासात नोंदवण्यात आले आहे. बॉम्बे आयआयटीने याबद्दलचा अभ्यास केला असून त्यासाठी ऑटोमॅटिक वेदर स्टेशन्सच्या माहितीचा आधार घेण्यात आला आहे. त्यामुळे मान्सूनचा अंदाज बांधणार्‍या पद्धतीत बदल करण्याची गरज बॉम्बे आयआयटीकडून व्यक्त करण्यात आली आहे.

सध्या भारतीय हवामान खाते सांकेतिक सांख्यिकी अंदाज प्रणालीचा वापर करून हवामानाच्या अंदाजाची माहिती देते. यासाठी 100 वर्षे जुन्या पर्जन्यमानाची आकडेवारी आणि मागील सहा वर्षांच्या हवामानाचा अभ्यास यासाठी केला जातो. पॅसिफिक आणि उत्तर अटलांटिक समुद्रातील पाण्याच्या पृष्ठभागावरील तापमानाचादेखील यासाठी विचार केला जातो.

बॉम्बे आयआयटीच्या सहा सदस्यीय संघाने ऑटोमॅटिक वेदर स्टेशन्सच्या माहितीचा सखोल अभ्यास केला आहे. ऑटोमॅटिक वेदर स्टेशन्स 2005 मध्ये मुंबईत आलेल्या पुरानंतर उभारण्यात आली आहेत. 26 जुलै 2015 रोजी मुंबईत तब्बल 944 मिलीमीटर इतका पाऊस झाला होता. दररोजच्या पर्जन्यमानात एकसारखेपणा नसण्याचे प्रमाण वाढले आहे. यासोबतच रात्रीच्यावेळी पडणार्‍या पावसाचे प्रमाण आणि पावसाचा जोर दिवसाच्या तुलनेत अतिशय कमी आहे. पर्जन्यमानातील हा बदल आणि चढउतार मोजणारी कोणतीही यंत्रणा सध्या अस्तित्वात नाही. तसेच पर्जन्यमानात झालेले हे बदल टिपणार्‍या यंत्रणेची निर्मिती लवकरात लवकर करणे आवश्यक आहे. त्यामुळे धोरणे आखणार्‍यांना मदत होईल. यासोबतच शहरातील यंत्रणांना मुसळधार पावसासाठी सज्ज ठेवणेदेखील सोपे होईल, असे बॉम्बे आयआयटीच्या टीमने निरीक्षणानंतर म्हटले.

मुंबईच्या विविध भागांमधील स्थिती वेगळी आहे. इमारतींची उंची भिन्न आहे. एकाच भागात कमी उंचीच्या आणि गगनचुंबी इमारतीदेखील पाहायला मिळतात. यामुळे वातावरणात अस्थिरता येते आणि सध्या तरी याबद्दलची माहिती टिपणारी यंत्रणा अस्तित्वात नाही, अशी माहिती बॉम्बे आयआयटीच्या सिव्हिल इंजिनियरिंग विभागाचे प्राध्यापक सुबीमल घोष यांनी दिली आहे.