मुंबईतील डान्स बारमध्ये शौचालयात छुपी गुहा!

0

मुंबई । बिहारचे सिंघम म्हणून ओळखले जाणारे अमली पदार्थविरोधी पथकाचे उपायुक्त शिवदीप लांडे यांनी धडक कारवाई करून एक गुहा शोधली आहे. मुंबईतल्या ग्रँटरोडमधील एका डान्स बारमध्ये बारबालांना लपवण्यासाठी शौचालयात बनवलेली ही गुहा त्यांंनी शोधून काढली आहे.
राज्यात डान्सबारला बंदी असतानाही काही ठिकाणी लपूनछपून बार सुरूच आहेत. या प्रकारांना रोखण्यासाठी मुंबई पोलिसांनी कंबर कसली आहे. रविवारी डी.बी. मार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील डायमंड चित्रपटगृहाजवळ असलेल्या कल्पना बारच्या बारमालकाने बारबालांना पोलिसांच्या कारवाईपासून वाचवण्यासाठी अनोखी शक्कल लढवली आहे. या बारमध्ये बारबालांना लपवण्यासाठी शौचालयात गुहा बनवण्यात आली होती. शिवदीप लांडे यांना रविवारी गस्तीवर असताना याबाबतची खबर मिळाली. ही खबर मिळताच त्यांनी तत्काळ बारवर छापा मारला. यावेळी पोलिसांनी 12 बारबाला, बारमधील 9 जणांसह 18 ग्राहकांवर कारवाई केली, तर लांडे यांनी या बारची सखोल तपासणी करून शौचालयातील गुहा शोधून काढली. याप्रकरणी बारमालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास सुरू आहे.