मुंबई येथील साईराज डेकोरेटर्स यांनी यंदा गुरुपौर्णिमा उत्सवाच्या निमित्ताने शिर्डीतील साई मंदिरात मुख्य मंडप व समाधी परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई केली आहे. साईभक्तीपोटी गेल्या दहा वर्षांपासून ते गुरुपौर्णिमा, रामनवमी तसेच नववर्षाला शिर्डी मंदिरात मोफत रोषणाई करून देत आहेत. यंदा या रोषणाईच्या जोडीला तामिळनाडू राज्यातील होसूर येथील दानशूर साईभक्त एस. देवाराज यांच्या देणगीतून मंदिर व परिसरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. या उत्सवात यंदा झारखंडच्या राज्यपाल श्रीमती द्रौपदी मुर्मू, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील व पालकमंत्री राम शिंदे यांनी श्रींच्या समाधीचे दर्शन घेतले.