मुंबई । मुंबईतील हवेची शुद्धता मागील काही दिवसांपासून बर्याच प्रमाणात ढासळली आहे. सकाळी अचानक थंडी पडणे, दुपार झाली तरी वातावरणात आर्द्रता आणि प्रदूषित हवा कायम असणे, अशी सध्या मुंबईची स्थिती झाली आहे. हे धुरकट वातावरण आरोग्यासाठी हानिकारक असल्याचे ’सफर’ या संस्थेने नमूद केले आहे. मुंबईत गेल्या काही दिवसांपासून वातावरणात बदल होत आहेत. शिवाय, सकाळी मुंबईकरांना ढगाळ वातावरण अनुभवायला मिळाले. त्यामुळे वांद्रे-कुर्ला संकुल, बोरिवली, माझगाव, भांडुप परिसरात हवेचा दर्जा खालावल्याचे आढळून आले.
आरोग्यासाठी हानिकारक वातावरण
‘सफर’ या संस्थेने नोंदवलेल्या आकडेवारीनुसार मुंबईतल्या बीकेसी, भांडुप, बोरिवली, माझगाव या भागातील हवेचा दर्जा निकृष्ट स्तरापर्यंत खालावला होता. सर्वसाधारण हवेच्या प्रदूषणाचा मुंबईतील निर्देशांक 271 होता. शिवाय, ही हवा आरोग्यासाठी हानिकारक असल्याचंही नमूद केले गेले. बुधवारी सकाळी कुलाब्यात 23.4 अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदवण्यात आले. तर, सांताक्रूझ परिसरात 21.5 अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदवण्यात आले. कुलाबा परिसरात बुधवारी सकाळी 8.30 पर्यंत 88 टक्के आणि दुपारपर्यंत 75 टक्के आर्द्रता नोंदवण्यात आली आहे. तर, सांताक्रूझ परिसरात सकाळी 69 टक्के आणि दुपारी 47 टक्के आर्द्रता नोंदवण्यात आल्याची माहिती कुलाबा वेधशाळेकडून देण्यात आली आहे. सतत बदलत असलेल्या आर्द्रतेमुळे वातावरणात विषाणूंचा संंसर्ग वाढतो. त्यामुळे, दमा, सर्दी, ताप, श्वसनविकार घसादुखीसारख्या समस्यांचं प्रमाण वाढल्याचे दिसून आले आहे.