मुंबई । मुंबईत अनेक ठिकाणी पाण्याची साठवण करण्यासाठी व आप्तकालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी 50 वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या भूगर्भ पाण्याच्या टाक्यांतील पाण्याचा वापर यापुढे परिसरातील आग विझविण्यासाठी करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. यासंदर्भात, शिवसेनेचे नामनिर्देशित माजी सदस्य अवकाश जाधव यांनी या भूगर्भ पाण्याच्या टाक्यांचा सर्व प्रथम शोध घेतला व या टाक्यांमधील पाण्याचा वापर आप्तकालात आग विझविण्यासाठी करण्याची मागणी ठरावाच्या सुचनेद्वारे केली होती. हा ठराव 7 ऑक्टोबर 2016 रोजी पालिका सभागृहात मंजूर करण्यात आला होता. वास्तविक या अतिशय चांगल्या आणि योग्य सूचनेवर तात्काळ निर्णय घेणे अपेक्षित होते; मात्र उशिरा का होईना पालिका प्रशासनाने योग्य तो निर्णय घेतला. आता या निर्णयाची अग्निशमन दलाने तत्परतेने अंमलबजावणी करणे अपेक्षित आहे.
अवकाश जाधव यांना छत्रपती शिवाजी महाराज वस्तूसंग्रहालयाची पाहणी करताना भूगर्भ टाक्यांचा शोध लागला. त्यांनी या भूगर्भ पाण्याच्या टाक्यांबाबत पालिका जल अभियंता खात्याच्या जुन्या दस्ताऐवजानुसार माहिती घेतली असता अशा प्रकारच्या 66 पाण्याच्या टाक्या भूगर्भात असल्याची खळबळजनक माहिती त्यांना मिळाली. या सर्व पाण्याच्या टाक्यांची क्षमता 2.50 लाख लिटरची असल्याचे त्यांना समजले. पूर्वीच्या काळात या पाण्याच्या टाक्यांमधील पाण्याचा आणि उभ्या नळ खांब्याचा वापर आग विझविण्यासाठी करण्यात येत असे. वाढत्या शहरीकरणामुळे आणि वाढत्या अतिक्रमणामुळे या 66 पैकी 13 भूगर्भ पाण्याच्या टाक्या या नामशेष झाल्या आहेत. मात्र उर्वरित 53 पाण्याच्या टाक्यांमधील पाण्याचा वापर आप्तकालात आग लागल्यास आग विझविण्यासाठी करता येईल, ही संकल्पना अवकाश जाधव यांना सुचली व त्यांनी ही संकल्पना ठरावाच्या सुचनेद्वारे मांडून ती मंजूर करून घेतली.
टाक्यांचे हस्तांतरित
या सूचनेवर पालिका प्रशासनाने अभिप्राय देताना, या पाण्याच्या टाक्यांचे हस्तांतर हे राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम खात्याने 1960 च्या सुमारास पालिकेकडे केल्याचे म्हटले आहे. तसेच या पाण्याच्या टाक्यांमधील पाण्याचा वापर आप्तकाळात आग विझविण्यासाठी करावा याकरिता या सर्व भूगर्भ टाक्या अग्निशमन दलाकडे हस्तांतरीत करण्यात आल्या असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.