मुंबई : मुंबईसह उपनगरात रात्रभर पावसाने दमदार हजेरी लावली. हवामान विभागाने आज शनिवारी (९ जून) रोजी देखील मुंबईत जोरदार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. हवामान विभागाने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार, मुंबईसह महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरील भागात ९ जून ते १२ जून दरम्यान मुसळधार पाऊस कोसळणार आहे. असाच पाऊस उत्तर प्रदेश आणि आसपासच्या राज्यांत पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
युपीत २४ बळी
शुक्रवारी ८ जून रोजी उत्तर प्रदेशात वादळीवाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळला. वादळीवारा आणि पावसामुळे उत्तर प्रदेशात आतापर्यंत २४ जणांचा मृत्यू झाला आहे. पुढील चार ते पाच दिवसांत मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार देशातील अनेक राज्यांत जोरदार पाऊस कोसळणार आहे. यामध्ये मुंबई, कोकण, कर्नाटक, उत्तर प्रदेश, दिल्ली, हरियाणा, हिमाचल प्रदेशपासून पश्चिम बंगाल यांचा समावेश आहे. पुढील एक ते दोन दिवसांत मुंबईत जवळपास २० मिमी पावसाची नोंद झाली आहे. तसेच येत्या ४८ तासांत मुसळधार पाऊस पडणार असल्याने मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.