मुंबईत आता परवान्याचे नूतनीकरण संगणकाद्वारे होणार

0

मुंबई । सांताक्रुझ, जेव्हीपीडी मंडईतील परवानाधारकांचे मासिक भाडे, परवान्याचे नूतनीकरण संगणकाद्वारे करण्यात येणार आहे तसेच पालिकेच्या बाजार विभागाशी संबंधित 29 शेड्यूलपैकी महत्त्वाचे असलेले अनुज्ञापत्राचे (परवाना) नूतनीकरण आणि मासिक भाडे वसुलीची अंतिम चाचणी पूर्ण झाली आहे. परवाना शुल्कात 200 रुपयांवरून 400 रुपये आकारण्याचा निर्णय बाजार विभागाने घेतला आहे. या प्रस्ताविण्यात आलेल्या दरांमध्ये 17 वर्षांनंतर वार्षिक स्वरूपाचे असल्यामुळे या दरांत दुप्पट वाढ करण्यात आली आहे. सुरुवातीला सांताक्रुझ आणि जेव्हीपीडीमधील परवानाधारकांचे मासिक भाडे व परवान्याचे नूतनीकरण संगणकीकरण करण्यात येणार आहे.

गेल्या 16 वर्षांत दरवाढ करण्यात आली नव्हती. पालिकेच्या मंडयांतील सध्याचे भाडे 200 रुपये असून, यापुढे प्रस्तावित दरांनुसार 400 रुपये वार्षिक परवाना शुल्क भरावे लागणार आहे. पालिकेच्या मंडयांमध्ये परवानाधारकांना पाणी, वीज, शौचालय आदी सेवासुविधा पुरवण्यात येतात. पालिकेच्या मंडयांमध्ये शौचालयाच्या नुतनीकरण व पुनर्बांधणीसाठी 4 कोटींची तरतूद अर्थसंकल्पात केली आहे तसेच महापालिकेतर्फे 18 मंडयांच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले होते, त्यापैकी 8 मंडयांच्या दुरुस्तीचे काम इमारत परिरक्षण विभागांमार्फत पूर्ण करण्यात आले आहे, उर्वरित 10 मंडयांचे काम प्रगतिपथावर आहे. बाजार विभागातील सर्व अनुज्ञापत्रधारकांची माहिती सॅप प्रणालीत अंतर्भूत करण्यात येणार असून उर्वरित मंडयांचेही संगणकीकरण करण्याची कार्यवाही सुरू आहे.

5 मंडयांचे दुरुस्तीचे काम सुरू होणार
महापालिकेच्या अखत्यारीतील स्वा. सावरकर मंडई, लो. टिळक मंडई, मिर्झा गालीब मंडई, गोपी टँक मंडई व क्रांतिसिंह नाना पाटील मंडई अशा 5 मंडयांचे पारंपरिक दिसण्याच्या दृष्टीने सर्वांगिण दुरुस्तीचे काम सुरू करण्यात येणार आहे. खाजगी बाजारातील कोंबड्या ठेवण्यासाठी सध्या दरवर्षी 1000 रुपये आकारले जात असून, त्यात वाढ प्रस्ताविली असून, दरवर्षी ती 2000 रुपये असणार आहे. गोठवलेले मांस व मासळी/ ताजे मांस व मासळीसाठी दरवर्षी दीड हजार रुपये आकारले जात असून, त्यातही दुप्पट वाढ प्रस्ताविली आहे.