मुंबईत जलप्रवासी वाहतुकीच्या सल्लागार नेमण्यासाठी निविदा मागवल्या

0

मुंबई: महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डामार्फत बंदर विकास जलप्रवासी वाहतूक व जलपर्यटन ही कामे करण्यात येतात. जलप्रवासी वाहतुकीसाठी वॉटर ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशनची स्थापना करणे प्रस्तावित असून, यासंदर्भात सुसाध्यता अभ्यास करण्यासाठी सल्लागाराची नेमणूक करण्याबाबत निविदा मागवण्यात आल्या आहेत अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत लेखी उत्तरात दिली आहे.

मुंबई शहरातील जलप्रवासी वाहतुकीबाबत विधान परिषदेचे सदस्य राहुल नार्वेकर यांनी विधान परिषदेत हा प्रश्न उपस्थित केला होता. त्याला मुख्यमंत्रयानी हे उत्तर दिले. मुंबईच्या पूर्व पश्चिम किनारपट्टीवरील जलवाहतूक प्रकल्पांच्या अंमलबजावणीची जबाबदारी शासनाने महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाकडे सोपविलेली आहे. सध्या स्थितीत बांद्रा ते वर्सोवा, वरळी ते हाजी अली सी लिंक, नरीमन पॉईंट ते बोरीवली जलप्रवासी वाहतुकीबाबत सुसाध्यता व प्रकल्पाची व्यवहार्यता तपासण्यात येत आहे असेही मुख्यमंत्रयानी लेखी उत्तरात स्पष्ट केलयं.

कल्याण खाडी किनाराचा विकास

कल्याण शहराला लागून असलेल्या खाडी किना-याच्या विकासासाठी महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डामार्फत गणेशघाट ते वाडेघरपर्यंत संरक्षण भिंत, जेट्टी व पोचरस्ता तयार करण्यासाठी ४५० मीटरपर्यंत काम सुरू करण्यात आले आहेत हे काम एप्रिल २०१७ पर्यंत पूर्ण होईल अशी माहिती राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांनी विधान परिषदेत दिली. कल्याण खाडी किना-याच्या विकास करण्याबाबतचा प्रश्न सदस्य जगन्नाथ शिंदे यांनी विधान परिषदेत उपस्थित केला होता. कल्याण गणेशघाट ते गंधारे पुलापर्यंतच्या परिसराचे सर्वेक्षण करून विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. आता सुमारे तीनशे मीटरपर्यंत काम पूर्ण झाले असून, १५० मीटरचे काम शिल्लक आहे. या पुढील कामासाठी निधी उपलब्ध करून देणेबाबत जिल्हा नियोजन समिती ठाणे यांच्याकडे प्रस्ताव तयार केला आहे. त्यानुसार २०१७ १८ या आर्थिक वर्षात निधी उपलब्धतेनुसार काम हाती घेण्यात येणार आहे असेही चव्हाण यांनी स्पष्ट केलं. जिल्हा नियोजन समितीच्या निधीवर प्रकल्प पूर्ण होणार नाही त्यासाठी शासनाने निधी उपलब्ध करावा असाही मुद्दा जयंत पाटील यांनी उपस्थित केला.