मुंबई : मुंबईसह उपनगरात काल संध्याकाळपासून जोरदार पावसाने झोडपले आहे. जनजीवन विष्कळीत झाले असताना पुढील ४८ तासात मुंबईसह उपनगर आणि कोकणात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आल्याने खबरदारी म्हणून मुंबईतील शासकीय कार्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मात्र अत्यावश्यक सेवा देणाऱ्या यंत्रणा सुरूच राहणार आहेत. मदत व पुनर्वसन विभागाने हा निर्णय घेतला आहे. मुंबईत ठिकठिकाणी पाणी साचले असून वाहतुकीवरही परिणाम झाला आहे.
पावसाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकाचे आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी मुंबईतील विविध ठिकाणांना भेटी देऊन तेथील परिस्थितीचा आढावा घेत आहेत.
आज आणि उद्या मुंबई आणि उपनगरात हवामान विभागाने रेड अलर्ट जाहीर केला आहे. येत्या 24 तासात मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघरमध्ये अतिवृष्टीचा तर दक्षिण कोकणात पुढील 48 तासात जोरदार पावासाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. याशिवाय मध्य महाराष्ट्रातही जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सुरु असलेल्या लोकल वाहतुकीवरही पावसाचा परिणाम झाला आहे. पावसामुळे लोकल ट्रेनची वाहतूक ठप्प झाली आहे. सायन रेल्वे स्टेशनवर प्लॅटफॉर्मपर्यंत पाणी साचलं आहे. तर सखल भागांमध्ये पाणी साचल्याने रस्ते वाहतूकही विस्कळीत झाली आहे. पाणी साचल्याने हिंदमाता फ्लायओव्हर, अंधेरी सबवे, मालाड सबवे, मिलन सबवे, किंग सर्कल, शिंदेवाडी, दादर टीटी हे मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत.