मुंबई – काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांच्या प्रमुख मार्गदर्शनात १२ जूनला पक्षाच्या बूथ कार्यकर्त्यांचा गोरेगावच्या एनएसइ कॉम्प्लेक्समध्ये मेळावा होणार आहे. यावेळी सुमारे एक हजार रिक्षाचालक राहुल गांधी यांचे स्वागत करणार आहेत. आम्ही ‘सूटबूटवाले’ नसून सामान्य जनतेला न्याय देण्याची आमची भूमिका असल्याने सामान्य रिक्षाचालक गांधींच्या स्वागताला येणार असल्याची माहिती मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी दिली.
भिवंडी न्यायालयात हजर झाल्यानंतर राहुल गांधी गोरेगावच्या सभेच्या ठिकाणी संबोधित करणार आहेत. या मेळाव्याबाबत संजय निरुपम यांनी माहिती दिली. ते म्हणाले की, राहुल गांधी सुमारे १५ हजार बूथ कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. आगामी निवडणूक पाहता पक्षातील सामान्य कार्यकर्त्यांशी संवाद साधण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. बूथ पातळीवरील कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास पक्षाला नवीन ताकद देईल असेही निरुपम यांनी यावेळी सांगितले. या मेळाव्याची पूर्ण तयारी झाल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, कर्नाटकप्रमाणे समविचारी पक्ष एकत्र आले तर भाजपला सत्तेपासून दूर ठेवता येईल, असा विश्वास काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला. सर्व समविचारी पक्षांना एकत्र आणून भाजपविरोधात महाआघाडी करण्याबाबत काँग्रेस पक्ष पुढाकार घेईल, असे चव्हाण यांनी सांगितले. याबाबतचा अहवाल गांधी यांना यावेळी सादर करून त्याबाबत त्यांच्याशी चर्चा होणार असल्याची शक्यता त्यांनी वर्तविली आहे.