आगीच्या घटनांचे सत्र थांबेना; अग्निशमन दलाच्या ८ गाड्यांनी मिळवले नियंत्रण
मुंबई | मुंबई शहरामध्ये आगीच्या घटनांचे सत्र थांबायचे नाव घेत नाहीये. आगीच्या घटनांमध्ये महानगरात जीवित आणि वित्तहानी होण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. सांताक्रुझ येथील आंतरदेशीय विमानतळालाच्या टर्मिनल १ ए या ठिकाणी असलेल्या कॉन्फरन्स हॉलला दुपारी आग लागली. मुंबईत आग लागण्याचे सत्र काही थांबताना दिसत नाहीये. नव्या वर्षाची सुरुवात होण्याआधीच कमला मिलमध्ये असलेल्या मोजो ब्रिस्ट्रो आणि १ अबव्ह या दोन रेस्तराँना आग लागली होती. यामध्ये १४ जणांचा बळी गेला. त्यानंतर मुंबईचे सत्र न्यायालय, तसेच माझगाव या ठिकाणचे गोदाम अशा ठिकाणी आग लागण्याचे सत्र सुरुच आहे. शनिवारी मुंबईतील विमानतळाला आग लागली.
अग्निशमन दलाच्या ८ गाड्या
या ठिकाणी पोहचल्या आहेत. विमानतळाजवळ असलेल्या सेरिमोनिअल लाऊंज या कॉन्फरन्स हॉल या ठिकाणी दुपारी ही आग लागली. एएनआय या वृत्तसंस्थेने या संदर्भातले वृत्त दिले आहे. डोमेस्टिक एअरपोर्टवर टर्मिनल १बी मधील कॉन्फरन्स हॉलला दुपारी आग लागली. अग्निशमन दलाच्या ८ गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि आगीवर नियंत्रण आणले. या घटनेमध्ये कोणत्याही प्रकारे जीवितहानी झाली नसल्याची माहिती आहे.
आगीच्या घटनांमध्ये वाढ
विमानतळावर गेट क्र. ९ जवळ तळमजल्यावरील सेरिमोनिअल लाऊंज या कॉन्फरन्स हॉल भागात दुपारी १.४६ च्या सुमारास आग लागली. हा भाग साधारणपणे पाच हजार चौ. फुटाचा असून तळमजला अधिक वर एक मजला असं हे बांधकाम आहे, अशी माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली. मागच्या रविवारीही कांजुरमार्गावरील सिनेव्हिस्टा स्टुडिओत लागलेल्या आगीत एकाचा होरपळून मृत्यू झाला होता. ४ जानेवारी रोजी अंधेरीत वातानुकूलन यंत्रामध्ये लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला होता. मैमून मंजिल येथे ही घटना घडली होती. त्यापूर्वी २९ डिसेंबर रोजी कमला मिल कंपाऊंडमधील वन अबव्ह व मोजो ब्रिस्टो या पबमध्ये आग लागल्याने १४ जणांचा मृत्यू झाला होता. तर १८ डिसेंबर रोजी साकीनाका भानू फरसाण मार्टमध्ये लागलेल्या आगीत १४ कामगारांचा होरपळून मृत्यू झाला होता. या घटनांचा विचार केला तर मागील एक ते दीड महिन्यांच्या कालावधीत मुंबईत आग लागण्याच्या घटना थांबताना दिसत नाहीत असेच म्हणावे लागेल.
भिवंडीत फ्रीजचा स्फोट
भिवंडी शहरात शॉर्ट सर्किटमुळे फ्रिजमध्ये स्फोट झाल्याची घटना समोर आली आहे. स्फोट इतका भीषण होता, की या स्फोटात संपूर्ण किचन जळून खाक झालं, तर फ्रिजचे तुकडे उडाले. भिवंडी शहरातील निजामपुरा परिसरात फ्रिजमध्ये स्फोट झाल्याने एकच खळबळ उडाली. या इमारतीत राहणाऱ्या 25 ते 30 रहिवाशांना सुरक्षितपणे इमारतीबाहेर काढण्यात आलं. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि निजामपूर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाने या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. अग्निशमन दलाच्या जवानांनी किचनमधून दोन सिलेंडर बाहेर काढले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.
-इमारत कोसळून लोक अडकले
मुंबईतील विद्याविहार येथील परिसरात एका तीन मजली इमारतीचा भाग कोसळल्याची घटना शुक्रवारी रात्री उशिरा घडल्याचे वृत्त आहे. या दुर्घटनेत सुरुवातीला तीन जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत होती. मात्र, दोघे जण अडकले होते, त्यांना सुखरुप बाहेर काढले असल्याचे सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विद्याविहार येथील कर्सन जेठा या तीन मजली इमारतीच्या जिन्याचा काहीसा भाग रात्री अकराच्या सुमारास कोसळला. या कोसळलेल्या ढिगा-याखाली तीन जण अडकले असल्याची माहिती देण्यात आली. मात्र. या ढिगा-याखाली दोघे जण अडकले होते. या अडकलेल्या दोघांची अग्निशमन दलाच्या जवानांनी सुखरुप सुटका केली असून दोघेही या घटनेत किरकोळ जखमी झाले आहे.