औरंगाबाद : मुंबईत 31 जानेवारीला मराठा समाजाचा मोर्चा निघणार आहे. मरिन ड्राईव्ह ते आझाद मैदान असा हा मोर्चा निघणार आहे. मराठा मोर्चाच्या आयोजकांनी औरंगाबादमध्ये आज, या मोर्चाबाबत माहिती दिली. मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी राज्यभरात काढण्यात आलेल्या मराठा मूक मोर्चांना ‘विराट’ प्रतिसाद मिळाल्यानंतर आता मुंबईतल्या मोर्च्याकडे सर्वांचे लक्ष लागणार आहे.
राज्यभरात विराट मोर्चे
कोपर्डी बलात्काराच्या घटनेच्या निषेधार्थ आणि मराठा समाजाच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी राज्यभर मराठा समाजाचे मूक मोर्चे काढण्यात आले होते. या मोर्चात लाखोंच्या संख्येने लोक सहभागी होत असून अत्यंत शांततेत व शिस्तबद्ध निघणारे हे मोर्चे देशभर चर्चेचा विषय ठरले आहेत. विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान उपराजधानी नागपूरमध्ये मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चासाठी विदर्भासह उर्वरित महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणावर समाजबांधव आले होते. या मोर्चाचे नेतृत्व तरुणींनी केले. या मोर्चात सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी सहभागी झाले होते. या मराठा तरुणींचा समावेश असलेल्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदन दिले. त्याच वेळी मराठा आरक्षणाचा निर्णय तातडीने घेण्यात यावा, अन्यथा बुलेट’ऐवजी बॅलेट’मधून सरकारला उत्तर मिळेल, असा इशाराही त्यांनी दिला होता. या पार्श्वभूमिवर आता मुंबईत 31 जानेवारी रोजी दुपारी 1 वाजता नियोजित ठिकाणापासून मराठा समाजाचा मोर्चा निघणार आहे. या मोर्च्यांनंतरा थेट राज्यपालांनाच विविध मागण्यांचे निवेदन देण्यात येणार आहे, अशी माहिती मराठा मोर्चाच्या आयोजकांनी दिली.