मुंबईसह कोकणात मुसळधार पावसाचा अंदाज; सतर्कतेचा इशारा

0

मुंबई: मुंबईत सकाळपासूनच जोरदार ते मध्यम स्वरुपाचा पाऊस सुरु आहे. ठाणे, कल्याण, डोंबिवलीत जोरदार पाऊस झाला आहे. दरम्यान मुंबईतील काही भागांसह ठाणे व कोकण विभागात पुढील ४८ तासात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. मध्य भारतामध्ये कमी दाबाचा पट्टा कार्यरत असल्याने पुढील काही दिवस कोकण किनारपट्टीसहीत विदर्भामध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. पूर्वमध्य अरबी समुद्रात कोकण किनारपट्टीवर वाऱ्यांची चक्रिय स्थिती आहे. त्यामुळे कोकण, विदर्भासह राज्याच्या इतर भागांत कमी-अधिक प्रमाणात पाऊस कायम राहणार आहे.

जुलै महिन्याच्या अखेपर्यंत राज्याच्या विविध भागांत पाऊस कायम राहणार आहे. प्रामुख्याने कोकण आणि विदर्भामध्ये पुढील काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केलेला आहे. कमी दाबाच्या पट्टय़ामुळे गेल्या तीन ते चार दिवसांपासून पावसाला अनुकूल स्थिती होती. परिणामी कोकणासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडय़ात अनेक ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली. अनेक दिवस पावसाने दडी मारलेल्या पुणे शहर आणि जिल्ह्यातही पाऊस झाला. मराठवाडय़ातील औरंगाबाद आणि बीड जिल्ह्यांत काही ठिकाणी अतिवृष्टी झाली. विदर्भातही पावसाची हजेरी होती.

आज आणि उद्या प्रामुख्याने विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. अनेक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांचा कडकडाटही होऊ शकेल. ३० जुलैला कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधारांचा इशारा देण्यात आला आहे. २७ ते ३० जुलै या कालावधीत मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडय़ातही काही ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे.