जळगाव : कोरोना व्हायरसने जनजीवन विस्कळीत करून टाकले आहे. कामधंदा बंद झाल्याने राज्यातून हजारो परप्रांतीय गोरगरीब गावाकडे परतीच्या प्रवासाला निघाले आहेत. मुंबई येथून उत्तर प्रदेशात जाण्यासाठी निघालेल्या विवाहितेची प्रवासात प्रकृती गंभीर होऊन तिचा मृत्यू झाला. महमार्गावर खेडी पेट्रोल पंपाजवळ शुक्रवारी ही घटना घडली. सुधा संतोष मिश्रा वय 22 असे विवाहितेचे नाव आहे.
मुंबईला रिक्षाचालक म्हणुन उदरनिर्वाह
संतोष मिश्रा हा मूळ उत्तर प्रदेशातील जोनपूर जिल्ह्यातील रहिवासी आहे. संतोष हा पत्नीसह ऐरोली मुंबई येथे वास्तव्य करीत होता. रिक्षा चालवून तरुण उदरनिर्वाह करतो. दरम्यान कोरोनामुळे सर्वत्र लॉक डाऊन करण्यात आले आहे. रिक्षाचे काम थांबल्याने संतोष हा पत्नी सुधा व सहा महिन्याची बालिका अशाना सोबत घेऊन उत्तर प्रदेशात जाण्यासाठी प्रवासाला निघाला. आज या कुटूंबाने जळगाव पास केले. महामार्गावरून पुढे जात असताना खेडी पेट्रोल पंपजवळ पत्नी सुधा हिची प्रकृती गंभीर होऊन बेशुद्ध झाली.
घटना कळताच एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विनायक लोकरे, उपनिरीक्षक विशाल सोनवणे, हेड कान्स्टेबल सचिन मुंडे, पोलीस कान्स्टेबल किशोर बडगुजर यांनी धाव घेत महिलेस शासकीय रुग्णालयात हलविले.तपासणीनंतर डॉ. दीपक जाधव यांनी मृत घोषित केले.
पोलिसांचे मानले आभार
पोलिसांनी संतोष याच्या नातेवाईकांना पुढच्या प्रवासाला मार्गस्थ केले. शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह संतोष व इतर नातेवाईकाच्या ताब्यात दिला. पोलिसांनी वाहनाची सोय करून दिल्यानंतर महिलेचा मृतदेह हलविण्यात आला.पोलिसांनी खूप महत्वपुर्ण मदत केल्याने या परप्रांतीय लोकांनी पोलिसांचे आभार मानले.