मुंबई । 1989 सालापासून म्हाडाच्या इमारतीत भाडेतत्त्वावर चालणारे न्यायालय आता दोन वर्षांत हायटेक न्यायालय बनणार आहे. नुकताच मागील शनीवारी भूमिपूजनाचा कार्यक्रम संप्पन झाला. जुन्या विक्रोळी न्यायालय इमारतीच्या बाजूला असलेल्या बाराशे चौरस मीटरच्या जागेवर वर्किंग मल्टिपर्पज कंपंनीने जमिनीवर दावा दाखवला असताना या जागेवर न्यायालय उभे राहावे यासाठी 2010 सालापासून वकील शिवशंकर जठाशंकर जोशी यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. 8 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर विक्रोळी कन्नमवार नगर 2 येथे 12 मजली वातानुकूलित न्यायालयाचे कामकाज सुरु झाले आहे. विक्रोळी पश्चिम नरेंद्र भवन येथून 1989 साली हे न्यायालय म्हाडाने स्थलांतरित केले. या इमारतीत एकूण 6 न्यायालये भरत होते.
अडीचशे वकील आणि अडीचशेच्या आसपास कर्मचारी काम करत होते. कुर्ला ते मुलुंडदरम्यान असणार्या पोलीस ठाण्याचा भार या न्यायालयावर पडत असे. वाढती लोकसंख्या आणि अपुरी जागा यासाठी न्यायालयाला स्वतंत्र जागेची आवश्यकता होती. न्यायालयाच्या बाजूला असलेल्या बाराशे चौरस मीटर जागेवर न्यायालय व्हावे यासाठी वकील शिवशंकर जोशी यांनी जनहित याचिका दाखल करून आठ वर्ष खडतर लढा देऊन अखेर हि जागा न्यायालय उभारणीसाठी खुली केली. 12 मजली वातानुकूलित असणार्या या इमारतीसाठी न्याय व विधी विभागातर्फे 48 कोटी रुपयांचा निधी पारित करण्यात आला आहे. दोन वर्षात या इमारतीचे काम पूर्ण होणार आहे. उपनगरातील 50 लाख नागरिकांना आपल्या वेळ आणि खर्चाची बचत होणार आहे. हे न्यायालय पूर्णता वातानुकूलित असून गाड्या पार्किंगचीदेखील व्यवस्था करण्यात येणार आहे. विक्रोळीमध्ये स्वतंत्र उभे राहणार्या या न्यायालयामुळे मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज सत्र न्यायालयाचा भार कमी व्हायला मदत होणार आहे, अशी माहिती ज्येष्ठ वकील शिवशंकर जठाशंकर जोशी यांनी दिली.