मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील पाचही बाजार बंद

0

नवी मुंबई । माथाडी व सुरक्षा रक्षकांचा राज्यव्यापी लाक्षणिक बंद आणि विधीमंडळावरील धडक मोर्चा मंगळवारी पुकारण्यात आला होता. या बंदमध्ये सर्व माथाडी, मापाडी कामगार, सुरक्षारक्षक सहभागी होणार असल्याने मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील पाचही बाजारांतील सर्व व्यवहार मंगळवारी बंद राहणार आहेत. याचा परिणाम मुंबईतील भाजी-फळ पुरवठ्यावर होण्याची शक्यता आहे. राज्याच्या किरकोळ व्यापार धोरणासह माथाडी कायद्याची परिणामकारक अंमलबजावणी करून त्यातील तरतुदींचा दुरुपयोग रोखण्यासाठी कृती आराखड्यामध्ये सुधारणा केली जात आहे. त्यामुळे राज्यातील सर्व माथाडी मंडळामध्ये सुसूत्रता ठेवण्यासाठी व अधिनियमामध्ये आवश्यक त्या सुधारणा करण्याच्या दृष्टीने राज्य स्तरावर एकच माथाडी मंडळ स्थापन करण्यासाठी अभ्यास गटाची नियुक्ती करण्याबाबत सरकारने निर्णय काढला आहे. या निर्णयामुळे तमाम माथाडी व सुरक्षा रक्षक कामगारांच्या चळवळीवर आणि माथाडी मंडळाच्या कामकाजावर परिणाम होत असल्याने ते रद्द करण्याच्या मागणीसाठी हा राज्यव्यापी लाक्षणिक बंद पुकारण्यात आला आहे. माथाडी कामगार व सुरक्षा रक्षकांनी या न्याय मागणीसाठी 30 जानेवारी रोजी राज्यव्यापी लाक्षणिक बंद पुकारला होता. त्यानुसार राज्याच्या कामगार मंत्र्यांनी 31 जानेवारी रोजी मंत्रालयात सर्व संबंधितांची संयुक्त बैठक आयोजित केली. सरकारने काढलेले हे तिन्ही निर्णय एकमेकांशी संबंधित असल्याने ते तातडीने रद्द करण्याची मागणी त्यांनी मंत्र्यांकडे केली होती.

माथाडी कायदा व मंडळे धोक्यात आणण्याची कृती
हे निर्णय रद्द करण्याचे आश्‍वासन बैठकीत देण्यात आले होते. मात्र, सरकारने दिलेले आश्‍वासन पाळले नाही. माथाडी कायदा व मंडळे धोक्यात आणण्याची कृती चालूच ठेवली, असा आरोप करत हे आंदोलन पुकारण्यात आल्याचे सांगण्यात आले. माथाडी व सुरक्षारक्षक कामगार बचाव कृती समिती ज्येष्ठ कामगार नेते बाबा आढाव यांच्या अध्यक्षतेखाली असून, या कृती समितीत महाराष्ट्र राज्य माथाडी, वाहतूक आणि जनरल कामगार युनियनचे नेते आमदार नरेंद्र अण्णासाहेब पाटील, गुलाबराव जगताप, आमदार शशिकांत शिंदे, अखिल भारतीय माथाडी युनियनचे अविनाश रामिष्टे, अरुण रांजणे, महाराष्ट्र माथाडी आणि जनरल कामगार युनियनचे बळवंतराव पवार, प्रकाश पाटील, अखिल महाराष्ट्र माथाडी कामगार युनियनचे पोपटराव पाटील, चंद्रकांत रामिष्टे, महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाचे राजकुमार घायाळ, हनुमंत बहिरट, कापड बाजार युनियनचे जयवंतराव पिसाळ, मेटल बाजार कामगार संघाचे शिवाजी सुर्वे, महाराष्ट्र राज्य सुरक्षारक्षक संघटनेचे नंदाताई भोसले, लक्ष्मणराव भोसले, महाराष्ट्र माथाडी श्रमजिवी कामगार जनरल युनियनचे तानाजी कदम, डॉक वर्कर्स युनियनचे प्रतिनिधी आदी युनियनचा समावेश आहे.