मुंबई ते नेपाळ काठमांडू असा सोलो सायकलिंग ट्रेकसाठी रवाना

0

पिंपरीच्या क्षितिजचा सायकलिंग ट्रेकचा निम्मा टप्पा पूर्ण
आतापर्यंत साडेपाच हजार किमी अंतर कापले

पिंपरी : लहानपणांपासूनच सायकलिंग ट्रेकचा छंद आहे. थोडे कळू लागल्यावर मी सगळीकडे सायकलवर फिरत असे. हळूहळू सायकलींग हाच माझा छंद झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत पुणे-कन्याकुमारी, पुणे -मुंबई, पुणे गोवा, पुणे ते अलिबाग अशा मोहिमा यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. आताची मोहीम ही सर्वात मोठी मोहीम आहे. गेटवे ऑफ इंडिया मुंबई येथून 26 जानेवारीला सोलो सायकलिंगचा प्रवास सुरु झाला, असे पिंपरी-चिंचवड शहरातील क्षितिज विचारे याने सांगितले. क्षितीज हा मुंबई ते नेपाळ काठमांडू असा सोलो सायकलिंग ट्रेकसाठी रवाना झाला आहे. एकूण 7500 किमीचा टप्पा गाठायचा आहे. यापैकी निम्म्यापेक्षा जास्त अंतर त्याने पूर्ण केले आहे.

संपूर्ण मोहिम 70 दिवसांची
आापल्या मोहिमेबद्दल माहिती देताना क्षितीज म्हणाला की, या मोहिमेत मुंबईहून कन्याकुमारीपर्यंत कोलकत्ता, सिक्कीम, भूतान आणि नेपाळचा डोंगराळ भाग अशी शहरे असून 12 राज्ये, 3 देश, आणि 9 पर्वतरांगाचा समावेश आहे. ही संपूर्ण मोहीम एकूण 70 दिवसांची आहे मात्र आतापर्यंत फक्त 32 दिवस झाले आहेत. या मोहिमेचे मार्गक्रमण मुंबई ते दिवेआगर, दापोली, गणपतीपुळे, मालवण,गोवा पणजी, कर्नाटक-कुमता, उडपी, केरळ-कासार गोड, गुरुवार, कोची, कोल्लम. तामिळनाडू:कन्याकुमारी, रामेश्‍वरम, कट्टा मावडी, नागपट्टीनमम, पुडूचेरी, चेन्नई, आंध्रप्रदेश: नेल्लोर, ओंगोल, नादिकुटी. ओडिशा: गोपाळपूर, तुंगी, कोणार्क, कटक, भद्रक, बाळासोर, पश्‍चिम बंगाल: नंदकुमार, कोलकत्ता, कृष्ण नगर, मुरशीदबद, बिहार, साहेबगुंज, दलखोला, पाणी तुंकी, आसाम, भूतान, सिक्कीम, नेपाळ असा मार्ग आहे.

मोहिम यशस्वी होणारच
एवढी मोठी मोहीम पहिल्यांदाच अनुभवतो आहे. मोहिम मोठी असून जास्त दिवसांची असल्यामुळे थोडी भिती होती. मात्र आता काही वाटत नाही. मला सायकलींग आवडते. त्यामुळे हा त्रास वाटत नाही. त्यातच आपल्या अजून दोन देशांमधून पुढे जाणार आहे. त्यामुळे तिथे कसा अनुभव येतो, तेथील लोकांना काय वाटेल, तिथले वातावरण कसे असेल, या सगळ्या विचारांनी मी पुढे जातो आहे. मला माहित आहे, भारतातून जाणार्‍यांचे सर्वत्र स्वागतच होत असते. त्यामुळे ही मोहिम यशस्वी होणार यात शंका नाही. आतापर्यंत त्याने 5526 किमी अंतर कापले असून तो सध्या वेस्ट बंगालमधील रायगनी टू शिलगिरी मार्गावर असून आजचा 38 वा दिवस असून हा टप्पा 160 किमीचा असल्याचे तो सांगतो.