मुंबई निवड समितीच्या अध्यक्षपदी आगरकर

0

मुंबई । मुंबई क्रिकेट असोसिएशनने विविध निवड समित्यांची घोषणा शुक्रवारी केली. मुंबईच्या वरिष्ठ पुरुष क्रिकेट संघाच्या निवड समितीचे अध्यक्षपद भारताचा माजी गोलंदाज अजित आगरकरकडे सोपवण्यात आले आहे. मुंबईच्या या समितीमध्ये आगरकरसह भारताचा माजी फिरकीपटू नीलेश कुलकर्णी, जतीन परांजपे आणि सुनील मोरे यांचा समावेश करण्यात आला आहे. ही निवड समिती वरिष्ठ आणि 23 वर्षांखालील संघांची निवड करणार आहे.

भट्टाचार्य यांच्याकडे महिला संघाच्या निवडीची धुरा
अजित आगरकर यांनी टीम इंडियाकडून अनेक महत्वाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला आहे. अनेक वर्ष भारतीय संघात वेगवान गोलंदाजाची धुरा त्यांनी सांभाळली होती. आगरकर यांच्यासोबत मुंबईच्या 19-वर्षांखालील मुलांच्या निवड समितीचे अध्यक्षपद माजी क्रिकेटपटू राजेश पोवारकडे सोपवण्यात आले आहे. या निवड समितीमध्ये भारताचा माजी मध्यमगती गोलंदाज अविष्कार साळवीसह राजू सुतार आणि संतोष शिंदे यांचा समावेश असेल. 16 वर्षांखालील मुलांच्या संघनिवड समितीच्या अध्यक्षपदी अतुल रानडे तर 14 वर्षांखालील मुलांच्या संघ निवड समिती अध्यक्षपदी ओमकार खानविलकर यांची नियुक्ती केली आहे. तृप्ती भट्टाचार्य यांच्याकडे वरिष्ठ महिला संघाच्या निवडीची धुरा दिली असून 19-वर्षांखालील मुलींच्या संघाच्या अध्यक्षपदी कल्पना मूरकर यांची निवड केली आहे.