मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयातील रुग्णांना दिल्या जाणार्या जेवणात बासमती तांदुळ आणि लोकवन गव्हाचे पीठ पुरविण्याचा पालिका प्रशासनाचा निर्णय चांगला असला तरी प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी होण्याबाबत स्थायी समितीत सर्वपक्षीय सदस्यांनी साशंकता व्यक्त केली. रुग्णांना सकस अन्न देण्यासाठी त्याची काटेकोर अंमलबजावणी करण्यात यावी अशी मागणी केली. त्याचप्रमाणे सदर मालाचा पुरवठा करण्यासाठी महिला बचत गटांना संधी दिल्यास चांगल्या प्रतीचे धान्य कमी दरात उपलब्ध झाले असते झाले असते याकडे ही सदस्यांनी लक्ष वेधले.
अधिष्ठात्यांची चौकशीची मागणी
विरोधी पक्षनेते यांनी सदर खरेदी ही वार्षिक आहे का, तसेच ह्यापूर्वी काय देत होते, ह्याची माहिती देण्याची मागणी केली. प्रत्यक्षात रुग्णालयात काहीही नियमानुसार होत नाही. रुग्णांच्या आहाराचा दर्जा निकृष्ठ असतो. प्रत्येक रुग्णालयात फलकावर रुग्णाच्या माहितीसाठी आहारामध्ये काय दिले जाणार ते जाहीरपणे फलकावर लावण्यात यावे. तसेच रुग्णाच्या आहारात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याने सायनच्या लोकमान्य टिळक रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांची चौकशीची मागणी रवी राजा यांनी केली.
राजूल पटेल यांनी कूपर रुग्णालयाचे किचन इस्कॉन या संस्थेस चालविण्यासाठी दिल्याने ते स्वच्छ असून त्या व्यतिरिक्त इतर रुग्णालयातील किचन अस्वच्छतेने भरलेली असतात. साफसफाईची बोंबाबोंब असते. अनेक रुग्णालयात तुरीच्या डाळीऐवजी मुगाची डाळ दिली जाते. तसेच उकडा तांदूळ दिला जातो. त्यामुळे कंत्राटदाराची बाजू न घेता रुग्णांचा विचार झालाच पाहिजे असे सांगितले. बासमती तांदळाच्या अनेक जाती असून त्यातून नक्की कोणता तांदूळ दिला जाणार आहे. त्याचा नमुना स्थायी समितीसमोर दाखवला गेला पाहिजे त्यानंतरच सदर प्रस्तावास मान्यता द्यावी अशी सूचना विदयार्थी सिंह यांनी केली. तर शिवसेनेच्या सदस्या शुभदा गुडेकर यांनी रुग्णांना अन्न मिळणे हे आवश्यक असल्याने हा प्रस्ताव मंजूर करावा अशी मागणी करत, महिला बचत गटांना हे काम दिले असते, तर अधिक चांगल्या प्रतीचे धान्य रुग्णालयांना उपलब्ध झाले असते असे सांगितले. तर मनसे गटनेते दिलीप लांडे यांनी सदर कंत्राट मध्ये सरकारी संस्थांना सहभागी करण्याचे आवश्यकता असल्याचे सांगितले.
सर्व सदस्यांच्या सूचनांनुसार विचार करून दर्जा राखण्याचा प्रयत्न केली जाईल. जेवणाची एक थाळी संबंधित निवासी आरोग्य अधिकार्याला प्रथम देऊन तपासणी केल्यानंतरच रुग्णांना वाटप केले जाईल.
– संजय मुखर्जी , अतिरिक्त आयुक्त, मुंबई महापालिका