मुंबई, पुणे, ठाण्याचे दोन्ही संघ उपांत्यपूर्व फेरीत दाखल

0

चिपळूण । मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे जिल्ह्याच्या संघानी आगेकुच कायम राखते 45 व्या कुमार व मुली (18 वर्षाखालील) राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी आमदार चषक खो-खो स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवले.रोटरी क्लब ऑफ चिपळूण आणि चिपळूण जिल्हा खो खो संघटनेतर्फे येथील जोशी बाग मैदानात ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

कुमार गटात मुंबईने जळगावचे आव्हान (21-4,0-5) 21-9 असे 1 डाव व 12 गुणांनी परतावून लावत आपली विजयी घौडदौड सुरू ठेवली. विजयी संघाच्या शुभम शिगवण (2.40 मि, 2 मि व 4 गडी), आयुष गुरव (5 गडी), जितेश नेवाळकर (3.20 मि व 3 गडी) व सनी तांबे (4 गडी) यांनी सुरेख खेळ केला. कुमार गटातील दुस-या सामन्यात गतविजेत्या ठाण्याने उस्मानाबाद संघावर (13-5,0-5) 13-10 अशी 3 गुणांनी डावात मात केली. मुंबई उपनगरच्या कुमार संघाने यजमान रत्नागिरीचे आव्हान (16-4,0-5) 16-9 असे 7 गुणांनी डावाच्या फरकाने मात करीत संषुष्टात आणले. उपनगरच्या विजयात कर्णधार निहार दुबळे (2.50 मि व 3 गडी), सिद्धेश थोरात (3.40 मि) व अक्षय कदम (4 गडी) यांचा महत्वाचा वाटा होता. पुण्याच्या कुमारांनी रायगडचा (12-4,0-3) 12-7 असा 1 डाव व 5 गुणांनी सरळ मात केली. पुण्याच्या राहूल मंडलने 2.50 मि, भुषण कुदांडेने 3.30 मि संरक्षण केले तर शिवम महाजन व संकेत सुपेकरने प्रत्येकी 3 गडी टिपले.

मुलींच्या गटात सांगलीने रायगड संघावर (13-4,0-5) 13-9 अशी 1 डाव व 4 गुणांनी मात केली. सांगलीच्या अश्‍विनी पारसेने 3 मि छान हुलकावण्या देत आक्रमणात प्रतिस्पर्धी संघाचे 4 गडी टिपले. वैष्णवी परब (4.30 मि), सायली म्हैसधुणे (3.30 मि) व शिवानी गुप्ता (5 गडी) यांच्या चतुरस्त्र खेळामुळे मुंबईला धुळ्यावर (24-3,0-5) 24- 8 असा 1 डाव व 16 गुणांनी सहज विजय संपादन करता आला. ठाण्याच्या मुलींच्या संघाने औरंगाबादचा (10-2,0-3) 10-5 असा 1 डाव व 5 गुणांनी पराभव केला, ठाण्याच्या रेश्मा राठोड (3.40 मि नाबाद), गितांजली नरसाळे (3.30 मि) व वृत्तिका सोनावणे (3 गडी) यांनी सुंदर खेळ केला. गतविजेत्या पुण्याच्या मुलींच्या संघाने नाशिक बरोबरच्या सामन्यात (11-2,0-2) 11-4 असा 1 डाव व 7 गुणांनी विजय पटकावला. पुण्याच्या प्रियांका इंगळे (3.10 मि व 3 गडी) व भाग्यश्री जाधव (5 मि व 3 गडी) यांनी उल्लेखनीय खेळ केला. अहमदनगरने सोलापूरचे आव्हान (9-2,0-4) 9-6 असे 1 डाव व 3 गुणांनी परतावले, नगरच्या ज्ञानेश्‍वरी गाढेने पहिल्या डावात 4 मि व दुस-या डावात 2 मि संरक्षण केले. मुलींच्या अतिशय रंगतदार सामन्यात यजमान रत्नागिरीने मुंबई उपनगरचा (4-4,6-6,7-3) 17-13 असा 4 गुणांनी जादा डावात पराभव करून उपउपांत्य फेरी गाठली. रत्नागिरीच्या अपेक्षा सुतारने (4.10 मि, 2.20 मि , 4.10 मि नाबाद व 5 गडी) एकहाती किल्ला लढवला उपनगरच्या आरती कदमचे ( 2.20 मि, 1.50 मि, 1.50 मि व 6 गडी)प्रयत्न निष्फळ ठरले. उस्मानाबादने जळगावचा (11-2,03) 11-5 असा 1 डाव व 6 गुणांनी पराभव केला.