मुंबई : रेल्वे आपले रुपडे पालटत आहे, याचा अनुभव देणार्या अनेक घटना सध्या रेल्वे खात्यात घडत आहेत. तेजससारख्या आधुनिक साधनसुविधांसह सुपर एक्स्प्रेस लांब पल्ल्याची गाडी रुळावर चालवून रेल्वेने पारंपरिक गती मागे टाकून नवा वेग आत्मसात केला. त्यामुळे रेल्वेचे कौतुक होत असतांना आता आणखी नवी गोष्ट प्रवाशांना रेल्वेकडून अनुभवायला मिळत आहे. मुंबई-पुणे डेक्कन क्वीनला तिच्या नावाला शोभेल असे उपक्रम या गाडीत सुरू करण्याचा निर्णय रेल्वे खात्याने घेतला आहे. त्यातील एक भाग म्हणजे या रेल्वेमध्ये आता चक्क हॉटेल उभारण्यात आले आहे. हॉटेलचा हा डबा तयार होऊन तो रविवारी गाडीला जोडण्यातही आला. त्यामुळे आता नोकरीनिमित्ताने पुणे-मुंबई दररोज ये-जा करणार्या चाकरमान्यांसाठी सकाळचा नाश्ता आणि रात्रीच्या जेवणाची भ्रांत दूर होणार आहे. माटुंगा येथील वर्कशॉपमध्ये या हॉटेलचा डबा तयार करण्यात आला आहे.
सुशोभित हॉटेलचा अनुभव
या हॉटेलची रचना अतिशय उत्कृष्ट करण्यात आली आहे. हॉटेलप्रमाणे यात डायनिंग टेबल उभारण्यात आले आहेत. त्यासोबत स्वच्छ कुशन लावलेल्या खुर्च्या फिक्स करण्यात आल्या आहेत. पुरेशा ट्युबलाइट, पंखे लावण्यात आले आहेत. अगदी हॉटेलात असणारे शोभेचे दिवेदेखील आहेत. मेनू कार्डही प्रवाशांना उपलब्ध करून देण्यात आले आहे.
आकर्षक इंटिरीयर डेकोरेशन
वॉश बेसिनकडे स्टीलच्या प्लेट बसविण्यात आल्या आहेत. सिंक येथे आरसे तसेच फ्लोरिंग टाइल्सने बनवण्यात आले आहे. स्लाईडिंगचा दरवाजा, स्टोरेजसाठी कपाट इत्यादी गोष्टी याला अधिक आकर्षक बनवत आहेत. हॉटेलच्या भोवती पेंटिग्स येथे वातावरणनिर्मिती करण्यास सहाय्य करत आहेत.