मुंबई पोलिसांच्या दबंगगिरीविरोधात मोर्चा

0

दोषींवर कारवाईसाठी भुसावळातील चालकांनी रीक्षा एक दिवसासाठी ठेवल्या बंद ; स्थानिक पोलिसांकडून कारवाईला बगल

भुसावळ- मुंबई पोलिस दलातील दोघा पोलिसांनी दबंगगिरी करीत रीक्षा चालकांनी भाडे मागितल्यानंतर त्यांना धमकावून मारहाण केल्याचा प्रकार शहरात उघडकीस आल्याने रीक्षा चालकांनी या घटनेचा तीव्र निषेध करीत सोमवारी दुपारी शहर पोलिस ठाण्यावर रीक्षासह धडक मोर्चा काढत दोषींवर कारवाईची मागणी केली. स्थानिक शहर पोलिसांकडे यापूर्वीही संबंधितांविरोधात तक्रार केल्यानंतर दोषींवर कारवाई न झाल्याने रीक्षा चालकांनी पोलिसांच्या भूमिकेविषयी तीव्र संताप व्यक्त केला. मुंबईतील पोलिसांकडून गोर-गरीब रीक्षा चालकांना काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांना सोबत घेवून धमकावण्याचे प्रकार होत असताना पोलिस प्रशासनाकडून दोषींवर कारवाई होत नसल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे.

मुंबईतील पोलिसांची दबंगगिरी
रीक्षा चालकांनी शहर पोलिसांना दिलेल्या निवेदनानुसार, मुंबई पोलिस दलातील कॉन्स्टेबल मनोज पगारे व सागर पगारे यांच्या कुटुंबियांना घरी सोडल्यानंतर रेल्वे उत्तर भागातील केला सायडींग भागात रीक्षा चालवून उदरनिर्वाह करणार्‍या रीक्षा चालकाने भाडे मागितले असता त्यास दमदाटी करण्यात आली. आम्ही मुंबई पोलिस असल्याचे सांगून चालकाला धमकावण्यात आले. त्यानंतर 7 मे रोजी 12.30 वाजेच्या सुमारास मद्याच्या नशेत कॉन्स्टेबल मनोज पगारे सोबत काही आडदांड प्रवृत्तीच्या आठ ते दहा लोकांनी येत धुडगूस घातला. रीक्षा चालकांना जिवंत जाळून, मारून टाकण्याची तसेच रीक्षा फोडण्याची धमकीही देण्यात आली. शहर पोलिसात याबाबत तक्रार रीक्षा चालकांनी केली मात्र पोलिसांनी कुठलीही दखल घेतली नसल्याने संबंधित पोलिसांची अधिक हिंमत वाढली. 13 रोजी मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास कॉन्स्टेबल सागर पगारे व त्याच्या सोबतच्या साथीदारांनी चाकू, लोखंडी पाईप, हॉकी स्टीक आणून रीक्षा स्टॉपवर दहशत निर्माण केली. आमची तक्रार कुणी केली? याबाबत अश्‍लील शब्दात शिवीगाळ करण्यात आली तसेच रीक्षा चालकांना धक्काबुक्कीदेखील करण्यात आल्याचा आरोप निवेदनाद्वारे करण्यात आला आहे.

न्याय न मिळाल्यास आंदोलन
दोषी पोलिसांसह त्यांच्या सोबतच्या आडदांड प्रवृत्तीच्या लोकांवर कारवाई न झाल्यास कायदेशीर मार्गाने उपोषण, रस्ता व रेल रोको तसेच निषेध सभा, जाहीर सभा व भुसावळ बंद केले जाईल, असा इशाराही रीक्षा चालकांनी शहर पोलिसांना निवेदनाद्वारे दिला आहे.

रीक्षासह चालक धडकले पोलिस ठाण्यावर
पोलिसांकडूनच कायदा हातात घेतला जात असल्याने दोषींवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी केला सायडींग भागातील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर रीक्षा स्टॉपवरील सर्व रीक्षा चालकांनी आपल्या रीक्षांसह सोमवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास शहर पोलिस ठाण्यावर मोर्चा आणला. याप्रसंगी शहर पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक नाना सूर्यवंशी यांना झाल्या प्रकाराची माहिती देवून दोषींवर कारवाईची मागणी करण्यात आली.

यांच्या निवेदनावर स्वाक्षर्‍या
शैलेंद्र अहिरे, दीपंकार वाघ, संजय भालेराव, आबीद अली, अख्तर खान, संतोष ढोकळ, रवींद्र म्हस्के, प्रकाश कैथवास, शरीफ तडवी, शेख शफी, सिद्धांत नन्नवरे, अशोक बाविस्कर, आदेश ससाणे, दीपक बिर्‍हाडे, छंदक शेजवळ, दिलावर तडवी, अनिल मरसाळे, शरीफ शेख, राजेश शिरसाठ, आशिष भारद्वाज, सईद अहमद, लुसी अँथोनी, गणेश तायडे, अर्जुन गायकवाड, सिद्धार्थ शेजवळ, अकबर खान, राजेश बाविस्कर, राजेश तायडे, जाहीद अली, युनूस मलक, राहुल तायडे, प्रीतम सोनवणे, गोविंदा सपकाळे, हेमंत महाजन, सुरेंद्र हिवराळे, अ.सईद, अक्षय गवळे, मुकेश बाविस्कर, सोहिल पिंजारी, रत्नाकर भालेराव, संजय रंधे, संजय मोहासे, दिलीप मोहासे, चंदू बोराडे, वसीम शेख आदींच्या निवेदनाद्वारे स्वाक्षर्‍या आहेत.