मुंबई महापालिकेच्या 16 मराठी शाळा बंद करण्याचा प्रस्ताव हाणून पाडला

0

मुंबई । पटसंख्या घटल्याचे कारण देत तब्बल 16 मराठी शाळा बंद करण्याचा प्रशासनाचा डाव सोमवारी शिक्षण समितीत जोरदार विरोध करीत हाणून पाडण्यात आला. या शाळा बंद करण्यापेक्षा चांगल्या सुविधा द्या आणि पटसंख्या वाढवण्यासाठी उपाययोजना करा, असे सक्त निर्देश शिक्षण समिती अध्यक्षा शुभदा गुढेकर यांनी प्रशासनाला दिले. यावेळी मराठी शाळा बंद करण्याचे प्रस्ताव प्रशासनाकडे परत पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला. येत्या शैक्षणिक वर्षात मराठी शाळांबरोबरच उर्दू, गुजराती, तेलगू भाषेच्या शाळा विद्यार्थीसंख्या घटल्याने बंद करण्याचा प्रस्ताव प्रशासनाकडून शिक्षण समितीत मांडण्यात आला.

दादर, परळ भागातील शाळांवर आलेले गडांतर
दादर, परळ, वडाळा, परिसरातील आठ शाळांसह मुंबईभरातील शाळांचा समावेश आहे. या शाळांची पटसंख्या 20 पेक्षा कमी झाल्यामुळे या शाळा बंद करून पालिकेच्या जवळच्याच शाळेत त्यांचे विलीनीकरण करण्याचा हा प्रस्ताव होता. मात्र प्रशासन जाणीवपूर्वक या मराठी शाळा बंद करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे शिवसेनेचे नगरसेवक सचिन पडवळ यांनी सांगितले. दुरुस्तीच्या नावाखाली शाळांचे स्थलांतरीत करून कालांतराने या शाळा बंद करण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले. तर शिक्षण समिती सदस्यांशी कोणतीही चर्चा न करता थेट शाळा बंद करण्याचा प्रस्ताव कसा आणला गेला असा सवाल शीतल म्हात्रे यांनी केला.

बंद केलेल्या शाळांचा अहवाल द्या
आतापर्यंत किती शाळा बंद केल्या याचा सविस्तर अहवाल प्रशासनाने सादर करावा अशी मागणी माजी महापौर स्नेहल आंबेकर यांनी केली. दरम्यान, पालिकेच्या मराठी शाळांमधील पटसंख्या कमी झाल्याची जबाबदारी संबंधित शाळांमधील शिक्षकांचीही असल्याचे शिक्षण समिती अध्यक्षा शुभदा गुढेकर यांनी सांगितले. त्यामुळे अशा शाळांच्या घटलेल्या विद्यार्थी संख्येचे सर्वेक्षण करून जबाबदारीही निश्‍चित करा असे निर्देशही त्यांनी प्रशासनाला दिले.