मुंबई । शहरात सुरू असलेल्या मेट्रोच्या कामांमध्ये अनेक वृक्षांवर कुर्हाड चालवली जात आहे. झाडे तोडल्यामुळे पर्यावरणाचा समतोल ढासळत आहे. परिणामी, अशा प्रकल्पांबाबत एका झाडाच्या बदल्यात दोन झाडे लावण्याची अट घालावी, अशा प्रस्तावावर एकीकडे चर्चा सुरू असताना मध्य रेल्वेने नवा आदर्श घालून दिला आहे. कुलाबा ते सीप्झ अशा भुयारी मेट्रो 3 साठी तोडण्यात आलेल्या झाडांचे पुनर्रोपण छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या लांब पल्ल्यांच्या स्थानकाच्या मागच्या प्रवेशद्वारातील मोकळ्या जागेत करण्यात आले आहे.मेट्रो 3 साठी अनेक ठिकाणी खोदकाम सुरू आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी झाडांची बेसुमार तोडणी करण्यात आली आहे. सुमारे 2 हजार झाडांची प्रकल्पासाठी कत्तल करण्यात आली आहे. त्यातील वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स येथील अनेक झाडे तोडण्यात आली असून, त्यांचे पुनर्रोपण या मध्य रेल्वेच्या लांब पल्ल्याच्या प्लॅटफॉम क्र.18 जवळील मोकळ्या जागेत करण्यात आले असून, हेरिटेज गल्ली, असे या जागेचे नामकरण करण्यात आले आहे. वर्ल्ड हेरिटेज डे निमित्ताने बुधवारी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक डी. के. शर्मा यांच्या हस्ते या हेरिटेज गल्लीचे बुधवारी उद्घाटन करण्यात आले आहे.
हेरिटेज गॅलरीत 100 झाडांना नवसंजीवनी
पुनर्रोपणात 40 टक्के झाडेच केवळ जगतात. या ठिकाणी पुनर्रोपण केलेल्या झाडांना पालवी फुटली असल्याचे मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक एस. के. जैन यांनी सांगितले. या ठिकाणी करंजा, वड, अशोक, पिंपळ अशा झाडांना जगवण्यात आले आहे. हेरिटेज गल्लीत ब्रिटिशकालीन वाफेवर चालणारी क्रेन, स्टोन क्रशर मशीन, पहिले इलेक्ट्रिक इंजिन, हॅन्ड ट्युब फायर इंजिन, काँक्रीट मिक्सर, प्रिटिंग प्रेस मशीन असा पुरातन इतिहास रेल्वेप्रेमींसाठी जतन करण्यात आला आहे.