मुंबई विद्यापीठाचा अजब कारनामा : प्रश्नासोबत छापले उत्त्तरही

0

मुंबई । उशीरा होणार्‍या परिक्षा, हॉलतिकिटांचा होणार गोंधळ, परिक्षांचे निकाल वेळेवर न लागणं अशा वेगवेगळ्या कारणांसाठी मुंबई विद्यापीठाचे नाव समोर येत असते. त्यातच परीक्षा केंद्रांवर होणार्‍या कॉपीची प्रकरणे काही नवीन नाहीत. मात्र, यावेळी विद्यार्थ्यांपेक्षाही विद्यापीठाने पुढचे पाऊल टाकून नवा पराक्रम केला आहे. विद्यापीठाने कायदेशास्त्रातील मास्टर्ससाठीच्या (एलएलएम) प्रवेश परीक्षेचा पेपर उत्तरांसकट छापून टाकला. कायदेशास्त्राचे शिक्षण घेण्यासाठी मुंबई विद्यापीठाकडून प्रवेश परीक्षा घेण्यात येते. यात बहुपर्यायी प्रश्न विचारण्यात येतात. प्रश्नपत्रिकेत यावेळी योग्य उत्तराचा पर्याय इतर पर्यायांपेक्षा ठळक शाईमध्ये छापण्यात आला होता. परीक्षेला सुरुवात झाल्यानंतर विद्यार्थांना हा प्रकार लक्षात आला. वांद्रे येथील परीक्षा केंद्रावर तर विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका 20 मिनिटे उशीराने देण्यात आल्याचीही तक्रार आली आहे. प्रश्नासोबत उत्तरही या अशा प्रकारामुळे अनेक विद्यार्थ्यांची मज्जा झाली असली तरी खुप विद्यार्थी हैराण झाले आहेत. परिक्षा संपल्यानंतर या आयत्या मिळालेल्या उत्तरांचीच चर्चा अधिक होती.

परीक्षा दोन वाजता सुरू होणे अपेक्षित होते, पण आम्हाला 2 वाजून 20 मिनिटांनी प्रश्नपत्रिका हातात दिली. बहुपर्यायी प्रश्न होते. त्यातील एक पर्याय बोल्ड छापण्यात आला होता आणि ते योग्य उत्तर होते. असे एका परीक्षार्थीने सांगितले. मात्र, बोल्ड केलेले पर्याय अचूक होते की नाही, याची पडताळणी केली नसल्याचे स्पष्ट झाले आहे.