मुंबई । प्रोग्रेसिव्ह स्टुडंट्स मूव्हमेंट या संघटनेच्या वतीने मंगळवार, 23 रोजी कालिना येथील परीक्षा भवन येथे मुंबई विद्यापीठाच्या गोंधळाविरोधात बेमुदत उपोषण घेण्यात आले. विद्यार्थांचे भवितव्य अंधारात जात असताना शिक्षण मंत्री कोणतीही ठोस कारवाई करत नसून शिक्षण मंत्रीच्या शिक्षणावर आता शंका निर्माण होत आहे. मुंबई विद्यापीठातील शेकडो विद्यार्थ्यांनी या उपोषणात सहभाग घेतला. उपाध्यक्ष सूरज सिंग ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आलेल्या या उपोषणात विद्यार्थ्यांनी महात्मा गांधी आणि क्रांतिवीर भगतसिंग यांच्या प्रतिमा हातात घेऊन अहिंसा, क्रांतीचा नारा विद्यार्थ्यांनी आंदोलनदरम्यान दिला.
विद्यार्थ्यांना नुकसानभरपाई द्या!
उपाध्यक्ष सूरज सिंग ठाकूर म्हणाले की, मुंबई विद्यापीठाच्या झालेल्या गोंधळावर शिक्षण विभाग अजूनही सुस्ती घेत आहे, विद्यार्थ्यांच्या भवितव्याची यांना कोणतीही काळजी नाही. महात्मा गांधी यांनी आम्हाला शिकवलेल्या अहिंसाच्या मार्गाने जर आम्हाला न्याय मिळत नसेल, तर क्रांतिवीर भगतसिंग यांनी शिकवलेल्या क्रांतीचादेखील आम्हाला न्यायासाठी शस्त्र उचलावे लागेल. यावेळी विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिकांचे निकाल वेळेत लागावे, पीडित विद्यार्थ्यांना प्रत्येकी 10 लाख रुपये नुकसानभरपाई द्यावी, परीक्षा फी कमी करावी, उत्तरपत्रिका तपासणी घोटाळ्याची न्यायालयीन चौकशी करा आदी मागण्या प्रोग्रेसिव्ह स्टुडंट्स मूव्हमेंट संघटनेच्या कार्यकर्त्यांनी उपोषणातून केल्या आहेत.
मायक्रोबायोलॉजी परीक्षा पुढे ढकलली
मुंबई । नोव्हेंबर महिन्यापासून सत्र सुरू झालेल्या एमएससी मायक्रोबायोलॉजीची परीक्षा 23 जानेवारीपासून घेण्यात येणार होती. आश्चर्याची बाब म्हणजे या अभ्यासक्रमाची एकही तासिका झालेली नाही. त्यामुळे परीक्षा कशी द्यायची? असा प्रश्न विद्यापीठातील एमएससीचे विद्यार्थी विचारत होते. दोन हजार विद्यार्थी एमएससी अभ्यासक्रमाची परीक्षा देत आहेत. मात्र, कॉलेजमध्ये तासिकाच न झाल्याने अभ्यासक्रमाबाबत कल्पना नव्हती. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना परीक्षेला सामोरे जावे लागणार होते, ही परीक्षा पुढे ढकलण्यात यावी अशी मागणी करणारे पत्र विद्यार्थ्यांनी कुलगुरू, परीक्षा विभागाला दिले होते. याप्रकरणी वृत्त प्रकाशित झाल्यानंतर मुंबई विद्यापीठाने परिपत्रक काढून नवीन वेळापत्रक जारी केले आहे. दरम्यान, परीक्षेची वेळ आणि ठिकाण कायम राहील, असेही विद्यापीठातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.