मुंबई । मुंबई विद्यापीठाच्या नवीन कुलगुरुंच्या निवडीसाठी कस्तुरीरंगन समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने कुलपती तथा राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्याकडे अंतिम 5 नावांची यादी सादर केली. यामधून 1 नाव राज्यपालांच्या वतीने जाहीर करण्यात येणार आहे. या आठवड्यात नवीन कुलगुरू मिळण्याची शक्यता आहे. 20 तारखेपूर्वी राज्यपालांकडून या 5 नावांपैकी एक नाव जाहीर केले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुंबई विद्यापीठाच्या नव्या कुलगुरुंच्या निवडीसाठी गठित केलेल्या समितीचे अध्यक्ष डॉ. के. कस्तुरीरंगन तसेच सदस्य डॉ. श्यामलाल सोनी आणि भूषण गगराणी यांनी शनिवारी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांची राजभवन येथे भेट घेवून, मुंबई विद्यापीठाच्या संभाव्य कुलगुरुंच्या नावाची यादी सादर केली. शनिवारी 8 उमेदवारांची मुलाखत घेतली होती, तर या दरम्यानच्या काळात समितीकडून आतापर्यंत एकूण 32 उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या होत्या.
मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूपदासाठी एकूण 102 अर्ज आले होते. यामधून 32 उमेदवारांची यादी तयार करण्यात आली. या 32 उमेदवारांना शुक्रवारी आणि शनिवारी मुंबईतील नरिमन पाइंट येथील निर्मल भवन या सिडकोच्या कार्यालयात मुलाखतीसाठी बोलवण्यात आले होते. यावेळी डॉ. के. कस्तुरीरंगन तसेच सदस्य डॉ. श्यामलाल सोनी आणि भूषण गगराणी यांनी उमेदवारांच्या मुलाखती घेऊन 32 मधून 5 नावे निवडली. शनिवारी निवडण्यात आलेल्या या 5 नावांची यादी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्याकडे शनिवारी सादर केली. या 5 नावामध्ये 2 विदर्भातील आणि 2 मुंबई व 1 पश्चिम महाराष्ट्रातील उमेदवारांचे नाव असल्याचे सूत्राकडून सांगण्यात आले. आता राज्यपाल या 5 नावांपैकी 1 नाव मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरू पदासाठी निवडणार आहेत. राज्यपालांच्या निर्णयाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.