मुंबई विद्यापीठावर पुन्हा एकदा नामुष्कीची पाळी आली आहे. गेले वर्ष गाजले ते पेपर तपासणीमधील गलथान कारभारामुळे. विद्यार्थ्यांना निकालासाठी कमालीची प्रतीक्षा करावी लागली. त्यामुळे विद्यापीठाच्या कुलगुरूंना पदावरून जावे लागले. त्याची बरीच उलटसुलट चर्चाही झाली. आता पुन्हा एकदा विद्यापीठाच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्याला कारणही तसेच आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने आज एनआयआरएफची यादी जाहीर केली. देशातील टॉप विद्यापीठं, कॉलेज, इन्स्टिट्यूट इत्यादी यादी जाहीर करण्यात आली.
देशपातळीवरील विद्यापीठांच्या यादीत गेल्या वर्षभरापासून आपल्या भोंगळ कारभारामुळे चर्चेत राहिलेल्या मुंबई विद्यापीठाचे नाव पहिल्या 100 मध्येही नाही. शिक्षणाचे माहेरघर म्हटल्या जाणार्या पुणे जिल्ह्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने या यादीत नववे स्थान मिळवले आहे. विद्यापीठांमध्ये पहिल्या क्रमांकावर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, बंगळुरू आहे, तर दुसर्या क्रमांकावर जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, दिल्ली आणि उत्तर प्रदेशातील बनारस हिंदू विद्यापीठाचा तिसरा क्रमांक आहे. विशेष म्हणजे देशातील टॉप 10 महाविद्यालयांमध्ये राज्यातील एकाही महाविद्यालयाचा समावेश नाही. पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजचा या यादीत 19 वा क्रमांक आहे. नुकतीच मुंबई विद्यापीठाच्या सिनेटची निवडणूक पार पडली. शिवसेना आणि भाजपच्या विद्यार्थी संघटनांमध्ये चुरशीची लढाई झाली. परंतु, मनसेचे नेते राज ठाकरे यांनी आता मुंबई विद्यापीठात सिनेटच्या निवडणुकीसाठी स्पर्धा करणार्या सर्वच पक्षांनी जरा यात लक्ष घालून आत्मचिंतन करण्याची गरज आहे. विद्यापीठाच्या कामाचा दर्जा सुधारण्याची जबाबदारी कोण्या एका व्यक्तीची नाही. विद्यापीठाशी निगडित प्रत्येकाने स्वतःहून पुढाकार घेऊन योगदान द्यायला हवे.
-निलेश झालटे, मुंबई.