मुंबई शरीरसौष्ठव संघटनेकडून भारत श्री विजेते आणि कुटुंबीयांचा गौरव

0

मुंबई । आम्ही संघटक आपली संघटना मोठी व्हावी म्हणून झटतोय, पण ज्या संघटनेने तुम्हाला उभे केले आहे, त्या दिग्गज खेळाडूंचेही संघटनेप्रति काही देणे लागते. जे खेळाडू मोठे झालेत, ज्यांच्यावर लक्ष्मीची चांगली कृपादृष्टी झाली आहे. जे सर्वदृष्टीने सक्षम झालेत अशा शरीसौष्ठवपटूंनी आपल्या ज्यूनियर्स खेळाडूंवरही मनापासून खर्च करावा. त्यांना मोठे करण्यासाठी नुसते मार्गदर्शनच नव्हे तर सोबतीला आर्थिक बळही द्यावे, असे आवाहन बृहन्मुंबई शरीरसौष्ठव संघटनेचे अध्यक्ष अजय (नंदू) खानविलकर यांनी भारत श्री विजेते खेळाडू आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या सत्कार सोहळ्याप्रसंगी केले.

बृहन्मुंबई शरीरसौष्ठव संघटनेचे अध्यक्ष अजय खानविलकर यांनी पुढाकार घेत नुकत्याच भारत श्री स्पर्धेत सुवर्ण जिंकणार्‍या सुनीत जाधव, सागर कातुर्डे आणि नितीन म्हात्रेसह त्यांच्या कुटुंबीयांचाही सत्कार करण्याचा आगळावेगळा कार्यक्रम गोरेगाव स्पोर्ट्स क्लबमध्ये दणक्यात पार पाडला. त्याचबरोबर मुंबईला शरीरसौष्ठवातील बाहुबलीचा लौकिक मिळवून देणार्‍या 60 संघटक आणि कार्यकर्त्यांचाही गौरव करून संघटनेने त्यांचे मनापासून आभार मानले. यावेळी शरीरसौष्ठववर आपुलकीने लिखाण तसेच खेळ-खेळाडूंच्या पाठीवर नेहमीच कौतुकाची थाप मारणारे तसेच काही चुका केल्यास तितक्याच प्रेमाने टीकेच्या फैरी झाडणार्‍या ज्येष्ठ क्रीडा पत्रकार अनिल जोशी यांचाही सत्कार मधुकर तळवलकर यांच्या हस्ते करण्यात आला तसेच सत्कारमूर्तीमध्ये शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते श्याम रहाटे, मधुकर थोरात, आनंद गोसावी, प्रवीण सकपाळ, अनिल राऊत यांचाही समावेश होता. या कार्यक्रमासाठी व्यायाममहर्षी मधुकर तळवलकर, भारतीय शरीरसौष्ठव महासंघाचे सर्वेसर्वा चेतन पाठारे, राज्य संघटनेचे सरचिटणीस अ‍ॅड. विक्रम रोठे, कार्यकारी संचालक मदन कडू, वरिष्ठ उपाध्यक्ष विकी गोरक्ष, ठाणे संघटनेचे अध्यक्ष प्रशांत आपटे आणि मुंबई संघटनेचे सरचिटणीस राजेश सावंत, सुनीत शेगडे आणि विजय झगडे उपस्थित होते.