मुंबई श्री शरीरसौष्ठव स्पर्धा, 54 खेळाडू अंतिम फेरीसाठी पात्र

0

मुंबई । कांदिवलीतील ग्रोवेल मॉलमध्ये एरव्ही खरेदीसाठी झुंबड उडालेली असते. मात्र, शनिवारी बायसेप्स, ट्रायसेप्स, सिक्स पॅक्स, शोल्डर, काल्फ, थाइज, अ‍ॅब्स, बॅक मसल्सचा अनोखा नजराणा अनुभवता आला. मुंबई श्री शरीरसौष्ठव स्पर्धेच्या प्राथमिक फेरीच्या नऊ गटांमध्ये झालेल्या चाचणीत मुंबईतील एकापेक्षा सरस शरीरसौष्ठवपटू मंचावर अवतरल्यामुळे कुणाची अंतिम फेरीसाठी निवड करायची, असा पेचप्रसंग परीक्षकांना पडला होता.

150 पेक्षा अधिक शरीरसौष्ठवपटूंचा सहभाग लाभल्यामुळे सिद्धेश रामदास कदम यांच्या शिवतेज आरोग्य सेवा संस्था आयोजित मुंबई श्री शरीरसौष्ठव स्पर्धेत रविवारी थरारक खेळाची अनुभूती घेता येईल. 55 किलो वजनी गटात संदेश सकपाळ, नितीन शिगवण, किशोर राऊत आणि राजेश ताटवे यांच्यात विजेतेपदासाठी कडवी लढत रंगेलं. 60 किलो गटातून आकाश वाणी, बप्पन दास, उमेश गुप्ता आणि विराज लाड हे अंतिम फेरीसाठी पात्र ठरले आहेत. 65 किलो वजनी गटात प्रतीक पांचाळ, आदित्य झगडे आणि जगदीश कदम हे गटविजेतेपदासाठी आमनेसामने असतील.

महेश राणे, श्रीदीप गावडे यांच्यात काँटे की टक्कर!
70 किलो वजनी गटातून सुजित महापात्रा, विशाल धावडे, चिंदन दादरकर यांनी विजेतेपदासाठी दावेदारी पेश केली आहे. 75 किलो गटात रोहन गुरव, महेश शेट्टी आणि सौरभ साळुंखे यांच्यात विजेतेपदासाठी काँटे की टक्कर असणार आहे. मुंबई श्री किताबाचा मानकरी हा वरच्या गटातील असल्यामुळे आपल्या उत्तम शरीरसंपदेसह सुयश पाटील, सुजन पिळणकर, दीपक तांबिटकर, महेश राणे यांच्यासारखे अव्वल बॉडीबिल्डर्समध्ये किताबासाठी जणू युद्धच रंगणार आहे. 80 किलो वजनी गटात सुयश पाटील,सुशांत रांजणकर, सुशील मुरकर आणि रोहन तांदळगावकर यांच्यात जेतेपदासाठी खरी चुरस असेल. 85 किलो वजनी गटातून सुजन पिळणकर, प्रशांत परब, रसल दिब्रिटो, अभिषेक खेडेकर आणि अनिकेत पाटील हे यांच्यात मुकाबला रंगणार आहे. 90 किलो वजनी गटात दीपक तांबिटकर, सचिन कुंभार आणि सकिंदर सिंग हे विजेतेपदाचे मानकरी असतील. 90 किलोवरील गटात महेश राणे, श्रीदीप गावडे यांच्यात काँटे की टक्कर पाहायला मिळणार आहे.

मुंबई श्री किताब विजेत्याला दीड लाख रुपयांचे पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे. उपविजेता 75 हजार रुपयांचा तर तिसर्‍या क्रमांकाचा खेळाडू 37.5 हजारांचा मानकरी ठरेल. गटातील अव्वल सहा खेळाडूंनाही रोख पुरस्कार मिळणार आहेत. पहिल्या सहा विजेत्यांना अनुक्रमे 20 हजार, 15 हजार, 10 हजार, 8 हजार, 6 हजार आणि 5 हजार अशा रकमेचे बक्षीस देण्यात येईल. इतकेच नव्हे, तर सर्वोत्कृष्ट पोझर आणि सर्वोत्तम प्रगतिकारक शरीरसौष्ठवपटूला प्रत्येकी 25 हजार रुपयांच्या पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे.