मुक्ताईनगरच्या आमदारांनी भेदभाव करू नये

उपनगराध्यक्षा मनीषा पाटील यांची पत्रकार परीषदेत भावना

मुक्ताईनगर : मुक्ताईनगर शहरात नव्याने जी कामे मंजूर झाले आहेत ती कामे मुक्ताईनगर शहरातील ठरावीक प्रभागांमध्येच मंजूर करण्यात आली आहेत. आमदार चंद्रकांत पाटील हे काही प्रभागाचेच नव्हे तर संपूर्ण शहराचे व तालुक्याचे आमदार आहेत व त्यामुळे त्यांच्या नगरसेवकांनी शहरवासीयांची दिशाभूल थांबवावी, अशी भावना मुक्ताईनगरच्या उपनगराध्यक्षा मनिषा पाटील यांनी पत्रकार परीषदेत व्यक्त केली.

यांची होती उपस्थिती
याप्रसंगी नगरसेविका साधना हरीषचंद्र ससाणे, नगरसेवक मस्तान कुरेशी, नगरसेवक शकील सर, नगरसेवक निलेश शिरसाठ, नगरसेवक बिल्किसबी आसीफ बागवान, नगरसेवक कुंदा अनिल पाटील, नगरसेवक शमिनबी अहमद खान आदींची उपस्थिती होती.

नाथाभाऊंनी दिला समान न्याय
उपनगराध्यक्षा मनिषा पाटील म्हणाल्या की, ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर झाल्यानंतर माजी मंत्री एकनाथराव खडसे व खासदार रक्षा खडसे यांनी 15 ते 20 कोटी रुपयांची विकास कामे मंजूर करीत असतांना शहरातील सर्वच्या सर्व प्रभागांमध्ये समान न्याय या हक्काने विकास कामे केली. त्यात प्रभाग 12, 14, 17 या शिवसेनेच्या नगरसेवकांच्या प्रभागामध्ये देखील विकास कामाचा समावेश होता. आता मात्र आमदार पाटील यांनी नव्याने कामे मंजूर करून आणली ती सेनेच्याच नगरसेवकांच्या प्रभागांमध्ये मंजूर करण्यात आली. यात काही गौड बंगाल आहे का? हे सेना नगरसेवकांनी जाहीर करावे, असेही त्या म्हणाल्या. आमच्या नेत्यांचा आमदारांनी आदर्श घेऊन सर्व शहराला न्याय द्यावा, अशी मागणी उपनगराध्यक्षा मनिषा प्रविण पाटील व नगरसेवकांनी केली.

त्या नगरसेवकांनी आत्मपरीक्षण करावे : संतोष कोळी
पत्रकार परीषदेला हजर असलेले सर्वच नगरसेवक भाजपाचेच आहेत का ? याचे आत्मपरीक्षण त्यांनी करावे. राष्ट्रवादीच्या कार्यक्रमांमध्ये यापैकी बहुतांशी नगरसेवक आणि नगरसेविकांचे पती उपस्थिती देतात. ते भाजपाचेच जर असतील तर त्यांनी आमच्यासोबत माजी मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे यावे व पत्रकार परीषद घ्यावी. राष्ट्रवादीच्या कार्यक्रमांमध्ये उपस्थिती दर्शवणार्‍या नगरसेवकांसह व नगरसेविकांचे पती हे खासदार कार्यालयात पत्रकार परीषद घेतात हेच भाजपाचे दुदैव असल्याचे ते म्हणाले.