शिवसेनेच्या इशारा आंदोलनाची प्रशासनाने घेतली दखल ; जेसीबीने मलबा हटवला ; बंद पडलेल्या जलशुद्धीकरण केंद्रातून पाणीपुरवठा
मुक्ताईनगर- गेल्या दोन ते तीन दिवसांपासून मुक्ताईनगर शहराला तसेच तालुक्यातील अनेक गावांना होत असलेला पाणीपुरवठा हा अतिशय दूषित प गढळून असून हे पाणी पिण्यासाठी वापरल्यास नागरीकांच्या जिवाला धोका होवू शकतो. पूर्णा नदीच्या पात्रामधून मुक्ताईनगर शहरासह तालुक्यात इतरही बर्याच गावांमध्ये पाणीपुरवठा होतो. दोन दिवसांपूर्वीच्या पावसामुळे नदीला पूर आल्याने ज्या ठिकाणाहून पाणीपुरवठा केला जातो त्या जॅकवेल लगतच नदीत संचार करणारे वन्यप्राणी पुरात पाहून आले. हरणांसह, नीलगाई, जंगली डुकरे यासह पाळीव प्राण्यांचे सडलेले अवशेषसह कचरा व लाकडेही वाहून आली आहेत तर या सडलेल्या मलब्यामुळे जॅकवेललगत मोठी दुर्गंधी पसरलेली आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे शहरावरील शहराला व अनेक गावांना असे दुर्गंधीयुक्त तसेच घाणेरडा पाणीपुरवठा पिण्यासाठी होत आहे. प्रशासनाने याची दखल घेणे गरजेचे असताना नागरीकांच्या जीवाचा खेळ सुरू असून पाण्याचे वेगळे कुठलेही नियोजन न करता हजारो नागरीकांचा जीव धोक्यात आणला जात आहे. नगरपंचायत प्रशासनाने वेळीच दखल घेवून शुद्ध पाणीपुरवठा करावा अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांच्यासह शिवसैनिकांनी दिला आहे.
इशारा देताच प्रशासनाने झटकली मरगळ
दूषित पाण्याबाबत तत्काळ नागरीरकांना पिण्यासाठी न वापरण्याची दवंडी देऊन पिण्याच्या पाण्यासाठी काही दिवसांसाठी वेगळे नियोजन केले जावे व तात्काळ असा सडलेला मलबा हा नदीपात्रातून काढून पात्र साफ करण्यात यावे तसेच या गंभीर प्रकारावर डोळेझाक करणार्या व नागरीकांच्या जीवाशी खेळ खेळणार्या संबंधित विभागांवर कारवाई करून तत्काळ उपाययोजना कराव्यात. अन्यथा शिवसेना स्टाईलने सदरील मलबा उचलून संबंधित प्रशासनाच्या व आपल्या दालनात भेट म्हणून दिला जाईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला. दरम्यान, शिवसेनेने दिलेलया या इशार्यानंतर तत्काळ नदीपात्रातील मलबा जेसीबीच्या सहाय्याने हटविण्यात आला.
यांची होती निवेदन देताना उपस्थिती
निवेदन देतेवेळी शिवसेना तालुकाप्रमुख छोटू भाई, अॅड.मनोहर खैरनार, माजी शिवसेना उपजिल्हाप्रमुख गोपाळ सोनवणे, अल्पसंख्यांक जिल्हा संघटक अफसर खान, शहर प्रमुख प्रशांत टोंगे, शहर प्रमुख राजेंद्र हिवराळे, राजेंद्र तळेले, युवासेना उपजिल्हाधिकारी पवन सोनवणे, नगरसेवक संतोष मराठे, शिवसेना शहर संघटक वसंत भलभले, माजी युवा सेना तालुकाप्रमुख सचिन पाटील, संतोष माळी, मनोज मराठे, प्रफुल्ल पाटील यांच्यासह असंख्य शिवसैनिक उपस्थित होते.
बिसलरी पाण्याचे आश्वासन हवेत -चंद्रकांत पाटील
मुक्ताईनगर शहर तसेच तालुक्यातील लोकप्रतिनिधींनी निवडणुकीपूर्वी नागरीकांना बिसलरी युक्त पाणी देऊ असे आश्वासन दिले होते. बिसलरी युक्त काय? साधे शुध्द पाणीही नगरपंचायत प्रशासन देण्यास अपयशी ठरले आहे. आजची परीस्थिती पाहता ज्या ठिकाणी हजारो जनतेला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो त्याठिकाणी मेलेल्या जनावरांचे अवशेष मोठ्या प्रमाणात सडलेल्या अवस्थेत पाण्यात पडलेले आहेत आणि असेच अशुद्ध पाणी लोकांना पाजून लोकांच्या आरोग्याशी खेळ खेळला जात असल्याचे जिल्हाप्रमुख चंदक्रांत पाटील म्हणाले.
पदाधिकार्यांनी मलब्याची केली पाहणी
शिवसेनेने तहसीलदार व नगर पंचायतीला निवेदन दिल्यानंतर शिवसेनेच्या दणक्याने खाडकन जागे झालेल्या पालिकेचे मुख्याधिकारी शाम गोसावी, पाणीपुरवठा सभापती निलेश शिरसाठ, माजी सरपंच प्रवीण पाटील हे शनिवारी दुपारी पाणीपुरवठा करणार्या जॅकवेल जवळ व खामखेडा पुलाजवळ जेसीबी घेऊन पोहोचले. मृत प्राणी तसेच मलबा काढण्यात आला मात्र हीच कार्यतत्परता चार दिवस आधी दाखविली असती तर नागरीकांवर दूषित पाणी पिण्याची वेळ आली नसती. विशेष म्हणजे शहरात आधीच बंद पडलेल्या जलशुद्धीकरण केंद्रातून पाणीपुरवठा होत आहे.