600 क्विंटल धान्याच्या चौकशीसाठी तीन अधिकार्यांकडून कसून चौकशी
भुसावळ– जळगाव जिल्ह्यात शंभर कोटी रुपयांचा अपहार झाल्याचा दावा माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी केल्यानंतर राज्यभरात खळबळ उडाली होती तर भुसावळसह मुक्ताईनगर, अमळनेर, चाळीसगाव व पारोळा येथे मुंबईतील पुरवठा आयुक्त कार्यालयातील पथके दोन दिवसांपासून तळ ठोकून कसून तपासणी करीत आहेत. खडसे यांच्या मुक्ताईनगरातच 600 क्विंटल धान्याचा अपहार झाल्याचा आरोप स्वतः खडसे यांनी प्रसिद्धी माध्यमांपुढे केल्यानंतर मुंबई पुरवठा आयुक्त कार्यालयातील अधिकारी संतोष शिंदे यांच्यासह तीन अधिकार्यांनी दोन दिवसांपासून गोडावूनची बारकाईने तपासणी केली. आलेल्या धान्यासह दुकानदारांना वाटप झालेल्या धान्याचे रेकॉर्ड तपासण्यात आले तर त्यानंतर पथकाने या गोदामाला सील ठोकल्याने मुक्ताईनगरात खळबळ उडाली आहे. पथकाने नेमके सील का ठोकले वा अपहाराबाबत नेमके काय आढळले? याबाबत माहिती कळू शकली नाही.