मुक्ताईनगरात खासदारांच्या कार्यालयाबाहेर काँग्रेसचे माफी मांगो आंदोलन

प्रवर्तन चौकातून मोर्चा काढत केले कार्यकर्त्यांनी केले शक्तिप्रदर्शन

मुक्ताईनगर : देशात महाराष्ट्रातून काँग्रेसने कोरोना वाढवला या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संसदेतील राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेदरम्यान केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षातर्फे सोमवारी निषेध मोर्चा काढत खासदार रक्षा खडसे यांच्या कार्यालयासमोर जोरदार शक्ती प्रदर्शनातून निदर्शने करीत घोषणाबाजी करण्यात आली.

यांच्या उपस्थितीत आंदोलन
आंदोलनाचे नेतृत्व जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार, आमदार शिरीष चौधरी, माजी खासदार डॉ.उल्हास पाटील, ओबीसी सेलचे राज्य उपाध्यक्ष डॉ.जगदीश पाटील, बुलढाणा जिल्हा सरचिटणीस निलेश पाऊलझगडे, जिल्हा युवक अध्यक्ष हितेश पाटील, शरद पाटील (जामनेर), ज्ञानेश्वर महाजन (रावेर), पुरुषोत्तम झाल्टे (नांदुरा), बंडू चौधरी (मलकापूर), पंकज पाटील (भुसावळ), अश्फाक काजी (वरणगाव), एस.ए.भोई, बी.डी.गवई, अ‍ॅड.अरविंद गोसावी, डी.डी.पाटील, सुलोचना वाघ, अ‍ॅड.ऐश्वर्या राठोड, श्याम तायडे, प्रभाकर सोनवणे, सखाराम मोरे, महिला काँग्रेस अध्यक्ष मनीषा कांडेलकर, राजु जाधव आदी उपस्थित होते.

पंतप्रधान पक्षाचे नव्हे देशाचे : जिल्हाध्यक्ष
निषेध मोर्चा पूर्वी जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांनी पत्रकार परीषद घेत सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान नसून भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधान आहेत. मध्य प्रदेशातील सरकार पाडण्यासाठी तसेच डोनाल्ड ट्रम्प यांचा कार्यक्रम घेण्यासाठी संपूर्ण देशावर बेजबाबदारपणे कोरोना लादून मजूर, बेरोजगार, निराधार यांना वार्‍यावर सोडले. खासदार राहुल गांधी यांनी 12 फेब्रुवारी 2020 रोजी संसदेमध्ये कोरोणाची भीषणता सरकारच्या लक्षात आणून दिल्यानंतर ही त्यांच्या वक्तव्याचे टिंगल करण्यात येऊन दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे देशात जी भयावह परीस्थिती निर्माण झाली, त्याला तोंड देण्यासाठी काँग्रेसने मजुरांना व गरीब निराधार यांना मदत केली. अशा प्रसंगी केंद्र सरकारने या सर्वसामान्य मजुरांकडून रेल्वेचे तिकीट सुद्धा घेतले. वास्तविक काँग्रेस पक्षाने सर्वसामान्यांची या काळात सेवाच केली. त्याच दरम्यान पंतप्रधानांनी कुंभ मेळाव्याला परवानगी दिल्याने 2742 रुग्ण हे पॉझीटीव्ह आले एव्हढेच नव्हे तर उत्तर प्रदेशात काँग्रेसने मजुरांना घरी पोहोचविण्यासाठी बसेस पुरवल्या असता योगी सरकारने त्या बसेस रस्त्यावर जाऊ दिल्या नाही. एवढी मोठी चूक असताना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने मात्र कोरोना फैलावला, असे वक्तव्य करणे म्हणजेच पंतप्रधानांचे बेजबाबदार व लाजिरवाणे वक्तव्य आहे. महाराष्ट्राला बदनाम करण्याचा हा प्रयत्न असून शिवरायांच्या आभिमान बाळगणार्‍या या महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागितली शिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, असा आरोप प्रदीप पवार यांनी पत्रकार परीषदेत केला.

आंदोलनातून शक्तीप्रदर्शन
माफी मांगो आंदोलन प्रसंगी मुक्ताईनगर, रावेर, बोदवड, जामनेर, यावल, चोपडा, भुसावळ यासह मलकापूर व नांदुरा तालुक्यातील काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. काँग्रेसने आंदोलनातून एक प्रकारचे शक्तिप्रदर्शन याप्रसंगी केले.