मुक्ताईनगरात नगरपंचायतीची निर्मिती, ग्रा.पं.निवडणूक रद्द

0

प्रशासकपदी तहसीलदारांची नियुक्ती ; माजी मंत्री एकनाथराव खडसेंच्या प्रयत्नांना यश

मुक्ताईनगर : मुक्ताईनगर नगरपंचायतीच्या निर्मितीला शासनाच्या उपसचिवांनी मान्यता दिल्याने शहरवासीयांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. भुसावळ विभागात आता सहा पालिका व दोन नगरपंचायती निर्माण झाल्या आहेत. खडसे यांच्या प्रयत्नानंतर वरणगावात पालिका तर बोदवडला नगरपंचायतीचा दर्जा मिळाला होता.

निवडणूक रद्द ; नगरपंचायतीचा दर्जा

मुक्ताईनगर ग्रामपंचायतीचा कार्यकाळ संपल्याने येथे 26 रोजी निवडणूक लागली होती तर मंगळवार, 5 पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया येथे होणार असतानाच सोमवारी रात्री उशिरा शासनाचे उपसचिव कैलास बधान यांनी मुक्ताईनगर येथे नगरपंचायत निर्मितीला हिरवा कंदील दिल्याने निवडणूक आपसुकच रद्द झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

तहसीलदार प्रशासक

मंगळवारपासून मुक्ताईनगरला नगरपंचायतीचा दर्जा मिळाल्याने पुढील प्रक्रियेपर्यंत तहसीलदार रचना पवार या नगरपंचायतीच्या प्रशासक राहणार आहेत.

राजकारण प्रभावी ठरणार

ग्रामपंचायतीच्या तुलनेत नगरपालिका व नगरपंचायतीला शासनाकडून अधिक निधी मिळत असल्याने आगामी राजकारण येथे प्रभावी ठरणार आहे. माजी मंत्री खडसे यांचा बालेकिल्ला म्हणून पूर्वाश्रमीचे एदलाबाद तर आताचे मुक्ताईनगर ओळखले जाते.

प्रयत्नांना यश- एकनाथराव खडसे

मुक्ताईनगर शहरात नगरपंचायत व्हावी, अशी गेल्या अनेक दिवसांपासून नागरीकांची मागी होती तर शासनाचे धोरण तालुका पातळीवर नगरपंचायत होण्यासंदर्भातदेखील आहे. शासनाकडे या संदर्भात पाठपुरावा सुरू असल्याने सोमवारी प्रत्यक्षात त्याबाबत आदेश निघाले. नगरपंचायत होणार असल्याने शहराच्या विकासाचा मार्ग आता मोकळा होईल, असे माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांनी दैनिक जनशक्तीशी बोलताना सांगितले.