मुक्ताईनगर नगरपंचायतीवर ओढवली नामुष्की ; नागरीकांमधून संताप
मुक्ताईनगर- कोटींच्या घरात पोहोचलेल्या थकबाकीमुळे वीज वितरण कंपनीने मुक्ताईनगरातील पथदिव्यांचा वीजपुरवठा खंडित केल्याने सोमवारी शहर अंधारात बुडाले. नगरपंचायतीवर ओढवलेल्या नामुष्कीनंतर नागरीकांनी सत्ताधार्यांवर चांगलीच टिका केली. तत्कालीन मुक्ताईनगर ग्रामपंचायतीकडे वीज वितरण कंपनीचे कोट्यवधी रुपयाचे विज बिल थकले होते. मध्यंतरी ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रुपांतर झाल्यावर नगरपंचायतीच्या प्रशासकीय काळात वीज वितरण कंपनीने पाणीपुरवठा व पथदिव्यांचा वीजपुरवठा खंडीत केला होता. त्यावेळी माजी मंत्री खडसे यांनी उर्जा मंत्र्यांशी संवाद साधुन तडजोडीच्या रकमेने वीजपुरवठा सुरळीत केला होता मात्र मागील महिन्यात पुन्हा वीज वितरण कंपनीतर्फे पुन्हा येथील वीजपुरवठा खंडीत करण्यात आला होता तेव्हा सुद्धा तडजोडी अंती वीजपुरवठा सुरळीत करण्यात येवून 3 डिसेंबरचा अल्टीमेटम देण्यात आला होता व अल्टीमेटमदरम्यान देखील बिलापोटी वीज वितरण कंपनीला नगरपंचायतीला 21 लाख रुपये भरणे आवश्यक असताना मुदतीत नगरपंचायतीने वीज बिलाचा भरणा न केल्याने 3 डिसेंबरपासून मुक्ताईनगर शहरातील पथदिव्यांचा वीजपुरवठा खंडित केल्याने शहर अंधारात बुडाले आहे.