मुक्ताईनगर तहसीलदार पैसे घेतल्याशिवाय नागरीकांची कामे करीतच नाहीत ! : आमदार चंद्रकांत पाटील यांचा आरोप
मुक्ताईनगर : मुक्ताईनगर तालुक्यातील रेशनवरील धान्य घेणार्या असंख्य नागरीकांच्या पुरवठा विभागाविषयी तक्रारी असल्याने शुक्रवार, 29 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजता आमदार चंद्रकांत पाटील यांनी तहसीलदारांचे दालन गाठत तहसीलदार श्वेता संचेती पैसे घेतल्याशिवाय कुठलेही काम करीत नसल्याचा आरोप केला. याप्रसंगी त्यांनी तहसील कार्यालयाच्या कारभाराचे चांगलेच वाभाडे काढल्याने तहसील वर्तुळात मोठी खळबळ उडाली. तहसील कार्यालयाच्या भोंगळ कारभाराविरोधात मुक्ताईनगर तालुका शिवसेनेचे वतीने 2 मे रोजी तहसीलदारांच्या दालनासमोर आंदोलन करण्यात येणार असल्याचे शिवसेना तालुकाप्रमुख छोटु भोई यांनी प्रसंगी सांगितले.
आमदारांच्या आरोपानंतर उडाली खळबळ
मुक्ताईनगर तहसीलदार पैसे घेतल्याशिवाय काम करीत नसल्याचा आरोप आमदार पाटील यांनी निवासी नायब तहसीलदार, पुरवठा विभागातील कर्मचारी, नागरीक, शिवसेना कार्यकर्ते यांच्यासमोर शुक्रवारी केला. तीन ते चार महिने उलटूनही नागरीकांची कामे होत नसल्याने व आता अक्षयतृतीया, रमजान ईद हे सण जवळ आल्याने नंतरही नागरीकांना धान्यापासून वंचित रहावे लागत असल्याने आमदारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. यावेळी तहसीलदार संचेती हजर नव्हत्या.
नागरीकांची कामे खोळंबल्याने संताप
तालुक्यातील धाबेपिंप्री येथील नागरीकांनी दोन महिन्यांपूर्वी शिधापत्रिका ऑनलाईन करण्यासाठी अर्ज दिला मात्र अद्यापही ऑनलाईन काम झालेले नाही यासह तालुक्यातील अनेक शिधापत्रिका धारकांनी ऑनलाईनसह अन्य कामांसाठी तहसीलमध्ये अर्ज केले मात्र त्यांचेही कामे करण्यात आलेली नाही. नाहक नागरीकांना खेड्या-पाड्यातून तहसील कार्यालयाच्या फेर्या माराव्या लागतात व त्रासाला सामोरे जावे लागते. तालुक्यातील वढवे गावाजवळ एका व्यक्तीने गाव नाल्यात अवैध मुरूम टाकल्याने शेतकर्यांच्या शेतात पाणी शिरल्याने नुकसान होत असताना तहसीलदारांकडे अर्ज करण्यात आला मात्र उपयोग झालेला नाही. शुक्रवारी आमदार चंद्रकांत पाटील यांनी तहसीलदारांचे दालन गाठत पुरवठा विभागातील कर्मचार्यांची कान उघाडणी केली. प्रसंगी तहसीलदार पैसे घेतल्याशिवाय कामच करीत नसल्याचा आरोप आमदारांनी केला. सोमवार, 2 मे रोजी तहसीलच्या गलथान कारभाराविषयी तालुका शिवसेनेच्या वतीने नागरीकांना पाठींबा देत तहसीलदारांच्या दालनासमोर सकाळी 11 वाजता आंदोलन करण्यात येणार आहे. याविषयी तहसीलदार श्वेता संचेती यांची प्रतिक्रिया जाणण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होवू शकला नाही.
यांची होती उपस्थिती
यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख छोटु भोई, प्रफुल पाटील, नगरसेवक राजेंद्र हिवराळे, आरीफ आझाद, शहरप्रमुख गणेश टोंगे, अफसर खान, महेंद्र मोंढाळे, स्वीय सहायक प्रवीण चौधरी, प्रशांत पाटील, गोपाळ सोनवणे, शुभम शर्मा व नागरीक उपस्थित होते.