मुक्ताईनगर तहसीलमध्ये छताचा भाग कोसळला

0
कर्मचारी बचावले मात्र संगणकाचे नुकसान
मुक्ताईनगर- शहरातील तहसील कार्यालयातील कर्मचार्‍यांच्या बैठक हॉलमधील एका बाजूकडील छताचा भाग अचानक कोसळल्याने यात संजय गांधी योजनेचे नायब तहसीलदार व महिला कर्मचारी लिपिक थोडक्यात बचावल्याची घटना शनिवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास घडली यात मात्र टेबलावरील संगणकाचे नुकसान झाले .
अचानक कोसळला छताचा भाग
तहसील कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी शनिवारी आपापल्या कामकाजात व्यस्त असताना शनिवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास कर्मचारी बैठक हॉलमधील शेवटच्या भागात संजय गांधी निराधार योजनेचे नायब तहसीलदार व कर्मचार्‍यांवर टेबलावर छताचा काही भाग कोसळला. नायब तहसीलदार मोहन सोनार व लिपिक दीपाली ढोले हे थोडक्यात बचावले व झालेल्या आवाजाने कार्यालयातील कर्मचार्‍यांनी त्यांच्याकडे धाव घेतली. टेबलावर पडलेल्या स्लॅबच्या तुकड्याने टेबलावरील संगणक, प्रिंटर, कीबोर्ड या साहित्याचे नुकसान झाले. संगायोचे विभागात नेहमीच निराधार लाभार्थीची गर्दी असते सुदैवाने सायंकाळच्या वेळी लाभार्थींची गर्दी नव्हती. सार्वजनिक बांधकाम उपविभागाने या बाबीकडे लक्ष देऊन छताच्या स्लॅबची दुरुस्ती करावी, अशी मागणी तहसीलदारांनी सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे उपअभियंत्यांकडे केली आहे.